गड किल्ल्यातून जपला जातोय महाराजांचा इतिहास

| उरण | वार्ताहर |

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने उरण परिसरातील ग्रामीण व शहरी भागात बच्चे कंपनीने किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियाच्या युगात वावरणारी बच्चे कंपनी आजही किल्ले बनविण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतवताना दिसत आहेत. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच बच्चे कंपनीला वेध लागतात ते किल्ले बनविण्याच्या कामाचे. अशातच मुलांना प्रोत्साहन देण्याकरता किल्ले बांधण्याच्या स्पर्धा देखील उरण तालुक्यातील काही सामाजिक मंडळामार्फत घेण्यात येत आहेत. पालकही बच्चे कंपनीला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

सध्या तयार किल्ले सर्वत्र पाहायला मिळत असताना ग्रामीण भागातील मुले डोंगरातील व शेतातील लाल काळया मातीपासून घराच्या अंगणात किल्ले तयार करताना पहावयास मिळत आहेत. किल्ला तयार झाल्यावर त्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान केली जाते. त्याचबरोबर पहारेकरी मावळे किल्ल्यावर ठेवले जातात. किल्ला मावळे, सैनिक व रंग यांनी सजवला जातो. त्यावर मोहरी टाकून उगवलेली हिरवळ दाखविली जाते. तसेच पाण्याचे कारंजे व रात्री किल्ल्यावर केलेल्या रोषणाईने किल्ले उजळून निघतात.

दिवाळीमध्ये बच्चे कंपनी आणि युवक युवती देखील निरनिराळे किल्ले, गड, सामाजिक देखावे साकारून कला आणि पारंपारिक संस्कृती जपताना दिसून येत आहेत. रायगड किल्ला, प्रतापगड, सिंधुदुर्ग गड कर्नाळा अशा प्रसिद्ध किल्ल्यांची प्रतिकृती चिरनेर परिसरातील गावागावात तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version