शिवजयंतीनिमित्त रांजणखार नवरात्रोत्सव मंडळाचा उपक्रम
| अलिबाग | वार्ताहर |
नवरात्र उत्सव मंडळ रांजणखार नाका यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि.19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गावातील व नजीकच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. विविध गटात पार पडलेल्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शाळेतील काही शिक्षकांनी काम पाहिले. दरम्यान, विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, मानचिन्ह व रोख रक्कम अशी भरघोस बक्षिसे देण्यात आली.
दरम्यान, स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजन व आयोजनासाठी परीक्षक, पालक, विद्यार्थ्यांसोबत आलेल्या शिक्षकांनी मंडळाचे, विशेषतः राजेंद्र मारूती पाटील व सर्व सभासदांना धन्यवाद देऊन विशेष कौतुक केले. तसेच, यापुढे अशा स्पर्धा मंडळाच्या वतीने आयोजित कराव्यात, यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
दरम्यान, बक्षीस वितरणानंतर गावातील ग्रामस्थांना वैशिष्ट्यपूर्ण असे पाच पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये अमरनाथ विठू पाटील यांना बुजूर्ग फुलवाले म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी उमेदीच्या काळात रांजणखार ते नागोठणे रोज सायकल प्रवास करत फुलांचा धंदा करून तीन मुलांना शिक्षण देऊन संसार उभा केला म्हणून गौरविण्यात आले.
केतन मोहन पाटील याने स्वतःच्या मेहनतीने वेल्डिंग व्यवसाय करून इतरही 5-6 तरूणांना रोजगार मिळवून दिला म्हणून कार्यकुशल तरूण 2024 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुरेंद्र बळवंत म्हात्रे यांना आदर्श बळीराजा म्हणून गौरविण्यात आले. शेतीबरोबरच फुलशेती, उत्कृष्ट भजनीबुवा, सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. जयेंद्र शांताराम ठाकूर यांना आदर्श नांगरधारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्यांनी ट्रॅक्टर/ट्रेलरला टक्कर देऊन शेतीची नांगरणी आतापर्यंत केली आहे. जयवंत कृष्णा पाटील यांना सामाजिक कार्य, स्वच्छता अभियान, श्रमदान, विशेषतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गावातील रूग्णांना मदत करणे, तसेच आतापर्यंत 62 वेळा रक्तदानासारखे कार्य केल्याबद्दल कार्यकुशल तरूण 2024 या पुरस्काराने गौरविण्यात आले.