प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांची सुरक्षा वार्यावर
। अलिबाग । प्रमोद जाधव।
अलिबाग एसटी बस स्थानकाच्या आवारात लोखंडी होर्डींग आहेत. हे होर्डींग जीर्ण अवस्थेत असून पडण्याची भिती नगरपरिषदेने व्यक्त केली आहे. मात्र, होर्डींग काढण्यास एसटी महामंडळ विभागाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी महामंडळाच्या या कारभारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाली आहे.
रायगड जिल्हयातील आठ एसटी बस आगारात ठिकठिकाणी मोठ मोठे होर्डींग आहेत. या होर्डींगद्वारे वेगवेगळया कंपन्यांची जाहीरात केली जात आहे. अलिबाग एसटी बस स्थानकाच्या आवारातदेखील जाहीरातीचे लोखंडी होर्डींग उभारण्यात आले आहेत. याबाबत अलिबाग नगरपरिषदेच्या प्रशासनाने स्थानकात होर्डींगच पहाणी केली असता स्थानकातील होर्डींग जीर्ण झाले असून त्याला गंज लागल्याचे दिसून आले. हे होर्डींग नादुरुस्त अवस्थेत उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे होर्डींग काढण्यासाठी नगरपरिषदेने एसटी बस आगार व्यवस्थापकांना लेखी पत्र दिले आहे. यावेळी घाटकोपरची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य ती उपाययोजना करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांमध्ये त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे. तसेच, कमकूवत असल्यास ते निष्कसित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हे होर्डींग काढण्याबाबत कोणतीही हालचाल स्थानक प्रशासनाकडून झाली नसल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळी वार्यासह ठिकठिकाणी कोसळत आहे. पुन्हा वादळी वार्यासह हा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही हानी होऊ नये याची काळजी एसटी महामंडळाने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
22 हजार प्रवाशांची सुरक्षा वार्यावर अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एसटी महामंडळाचे आगार व बस स्थानक आहे. मुंबई पुणेसह ग्रामीण भागात अलिबाग एसटी बस आगारातून बसेस सोडल्या जातात. या स्थानकात 75 बसेस आहेत. एकूण 421 फेर्या असून 22 हजार हून अधिक प्रवासी एसटीतून प्रवास करत असतात. दर दिवशी 23 हजार 800 किलो मीटरचा प्रवास होतो. मात्र, स्थानकात असलेल्या या जीर्ण झालेल्या होर्डींगमुळे 22 हजार प्रवाशांची सुरक्षा वार्यावर असल्याचे बोलले जात आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
बस स्थानकाच्या आवारात मोठ मोठी होर्डींग आहेत. काही होर्डींग गंजलेल्या व नादुरुस्त अवस्थेत आहेत. घाटकोपरसारखी दुर्घटना घडू नये यासाठी पंधरा दिवसात संरचनात्मक लेखा परिक्षण करणे. तसेच, कमकूवत असल्यास निष्कसित करण्याची लेखी सुचना पाच दिवसांपूर्वी आगार प्रमुख यांना दिल्या आहेत.
अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी तथा प्रशासक
अलिबाग नगरपरिषद
स्थानकाच्या आवारात असलेल्या लोखंडी होर्डींगबाबत कार्यवाही करण्याचे लेखी पत्र नगरपरिषदेकडून आले आहे. विभाग नियंत्रक कार्यालयाकडे याबाबत कळविले आहे. कार्यालयानेदेखील दखल घेत पहाणी करून कार्यवाही करण्याच्या सुचना एजन्सीला दिल्या आहेत. एजन्सीद्वारेदेखील हालचाल सुरु झाली आहे. आठ दिवसात पहाणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अजय वनारसे,
आगार व्यवस्थापक,
अलिबाग