रायगडावरील होळीचा माळ येथे हेलिपॅड होऊ देणार नाही; शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी

। महाड । प्रतिनिधी ।
महाड-ऐतहासिक किल्ले रायगडावर येत्या 6 किंवा 7 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड परिसरात सात हेलिपॅड तयार करण्यात येत आहेत. शिवाय रायगडावरही हेलिपॅड होणार असल्याचे बोलले जात आहे. किल्ले रायगडावर होळीचा माळ येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास संपुर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांकडून विरोध केला जात आहे. कोकण कडा मित्रमंडळ तसेच शिवप्रेमींकडुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि, गडाच्या पायथ्याशी कुठेही हेलिपॅड तयार करा; परंतु रायगडावर हेलिपॅड तयार करण्यास आमचा विरोध राहील. छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत. गडावरील राजांच्या पुतळ्यावर धुळ ऊडत होती. त्यामुळे आम्ही होळीच्या माळावरील हेलिपॅड काढायला लावले होते. आता तोच प्रकार होऊ देऊ नका. रायगडावर कोणत्याही प्रकारचे हेलिपॅड होता कामा नये. त्याला आमचा समस्त शिवप्रेमींचा विरोध असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच महाडमधील नितीन पावले, सिध्देश पाटेकर यांनीही होणार्‍या हेलिपॅडला विरोध दर्शविला आहे.दरम्यन, रायगडावर राष्ट्रपतीचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी उभारण्यात येणार्‍या हेलिपॅडवर विरोध होत आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देताना युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर, कोकण कडा मित्रमंडळ अध्यक्ष सुरेश पवार, सिद्धेश मोरे, छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक दिनोत्सव समितीचे रोहीत पवार यांच्यासमवेत स्वप्नील आरते, सुयोग पाटील, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version