जिल्हाभरातील शाळा पुन्हा गजबजल्या
| अलिबाग | प्रतिनिधी |
अडीच महिन्यांच्या दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर रायगड जिल्ह्यातील तीन हजार शाळांमध्ये सोमवारी (दि.16) पहिली घंटा वाजली. जिल्ह्यातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांचा किलबिलाट दिसून आला. पहिल्याच दिवशी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पाहावयास मिळाले. दरम्यान, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व पालकांसोबत संवाद साधला. दरम्यान, विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.
उन्हाळी सुट्टीचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे घेतला. काहींनी क्रिकेट, कबड्डी, गोट्यांसारख्या मातीतील खेळांचा आनंद लुटला. काहींनी मोबाईलमध्ये मग्न राहून सुट्टीचा आनंद लुटला. तर, काहींनी नातेवाईकांच्या घरी जाऊन उन्हाळी सुट्टी घालविली. शाळेत जाण्याची तयारी गेल्या आठवड्यापासून विद्यार्थ्यांची सुरू होती. अडीच महिन्याच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा सुरु झाल्या. नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारी नियोजन करण्यात आले. नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच शाळा व्यवस्थपन समितीचे पदाधिकारी, सभासद, पालक, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व गावांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांचा वर्षाव व ओवाळणी करीत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेत प्रार्थना घेण्यात आली. शासनाकडून देण्यात आलेल्या पुस्तकांचे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधण्यात आला. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. शाळेचा पहिला दिवस एक वेगळ्या उपक्रमातून साजरा करण्यात आला.
शाळांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. शाळेच्या आवारात रांगोळी काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्याच दिवशी नव्या वर्गातील विद्यार्थ्यांची ओळख करुन घेणे, त्यांना अभ्यासक्रमाविषयी माहिती देणे, अनेक शाळांनी शिक्षकांची बैठक घेण्यात आली. तासिकांचे नियोजन व वेळापत्रकही ठरविण्यात आले. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यासाठी शाळांनी भर दिला.
नवविद्यार्थ्यांना खेळण्यांचा आधार
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, तरीही शाळेची पहिल्यांदाच पायरी चढणारे विद्यार्थी शाळेच्या आवारात पोहोचताच हंबरडा फोडत होते. या विद्यार्थ्यांना आपुलकीने शिक्षक समजावित होते. त्यांचे शाळेत मन रमावे यासाठी वर्गात विविध खेळणी ठेवण्यात आली होती. त्यामुळे थोड्या वेळातच रडणारे विद्यार्थी खेळण्यात दंग होत असल्याचे दिसून आले. शाळेत रमण्यासाठी नवविद्यार्थ्यांना खेळण्याचा आधार मिळाल्याचे चित्र दिसून आले.
उन्हाळी सुट्टीनंतर शुक्रवारी 16 जूनपासून शाळा सुरु झाली. नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारी भोजन देण्यात आले. त्यानंतर गोड पदार्थ त्यांना देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके, गणवेश, बूट आदी साहित्यांचे वाटप पालक व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रमोद भोपी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, तालुका
शाळेचा गणवेश परिधान करून सकाळी शाळेत पोहोचलो. शाळेच्यावतीने आम्हा विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. एक वेगळा आनंद शाळेच्या पहिल्या दिवशी मिळाला. शाळेत आगमन होताच जो सन्मान झाला, त्यामुळे खूप समाधान वाटले. शाळेकडून पुस्तकेही देण्यात आली. शाळेचा पहिला दिवस कामयच आठवणीत राहील.
पार्थ जाधव,
विद्यार्थी
अधिकाऱ्यांची भेट
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नवगाव येथील जिल्हा परिषद शाळेला, तर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी वेश्वी येथील शाळेला भेट दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अलिबाग तालुक्यातील कुरुळ व मुरूड तालुक्यातील चोरढे शाळेला भेट दिली. अलिबागचे नायब तहसीलदार प्रताप राठोड यांनीदेखील शहाबाज येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. सर्व मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधला. शाळेत वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके
शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या एक लाख 81 हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. तर, 98 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्सचे वाटप करण्यात आले. नवीन पाठ्य पुस्तके, गणवेश, बूट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.







