| चिरनेर | प्रतिनिधी |
पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक, एटीएम कार्ड, अशी तेरा प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे व कार्ड तसेच पंधराशे रुपयांची रोख रक्कम असलेली, रस्त्यात पडलेली लेडीज पर्स एका रिक्षा चालकाला सापडली. मात्र, ही सापडलेली लेडीज पर्स या रिक्षा चालकाने संबंधित महिलेला परत करून आपला प्रामाणिकपणा दाखविला आहे. त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चिरनेर येथील रिक्षा चालक श्याम चौलकर हे शुक्रवारी (दि. 06) पनवेल येथे भाडे घेऊन गेले असता, रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना पंचरत्न हॉटेलच्या सर्कलजवळ रस्त्यामध्ये एक लेडीज पर्स पडलेली दिसली. ती त्यांनी उचलून, उघडून पाहिली असता, त्यात महत्त्वाची कागदपत्रे व कार्ड आणि पंधराशे रुपयांची रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यादरम्यान चौलकर यांच्या ओळखीचे चिरनेर गावातील संजय परदेशी यांच्याशी भेट झाली. रिक्षाचालक श्याम चौलकर यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी परदेशी यांनी पर्समधील कागदपत्रे पाहिल्यानंतर सरगम हरपाल सिंग या महिलेची पर्स असल्याचे त्यामधील कार्डवरून समजले. परंतु ही सापडलेली पर्स परत करण्यासाठी संजय परदेशी यांनी त्यांच्या ओळखीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो व्हायरल केले. आणि हरवलेली पर्स परत करण्याचे आवाहन केले. जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी हे फोटो व्हायरल केले होते.
त्यानंतर रिक्षाचालक श्याम चौलकर हे घरी आल्यानंतर त्यांनी चिरनेर पोलीस चौकीत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल सचिन कडू यांच्याशी संपर्क साधून, त्यांनादेखील ही पर्स दाखवली असता, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कडू यांनी या पर्समध्ये असलेल्या कार्ड वरून सरगम हरपाल सिंग या महिलेबरोबर मोबाईलद्वारे संपर्क साधून, या महिलेला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पनवेल करंजाडे येथे राहणारी ही महिला शनिवार (दि.8 ) रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास श्याम चौलकर यांच्या घरी पोहोचली. श्याम चौलकर यांनी या महिलेसह चिरनेर पोलीस स्टेशन गाठून, हवालदार श्री गदमले, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कडू यांना हरवलेली लेडीज पर्स या महिलेची असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला आणि कागदपत्रांवरील छायाचित्रांची खात्री करून, त्यांच्या समक्ष ही लेडीज पर्स सरगम हरपाल सिंग यांना देऊ केली. याकामी अमित परदेशी यांचेही सहकार्य लाभले असल्याचे श्याम चौलकर यांनी सांगितले.
यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप परदेशी, श्याम चौलकर, विजया चौलकर, आर्या चौलकर, भूमिका चौलकर उपस्थित होते. यावेळी सरगम हरपाल सिंग यांनी श्याम चौलकर यांचे आभार मानून, त्यांना काही रकमेचे बक्षीसही देऊ केले. दरम्यान रिक्षाचालक शाम चौलकर यांच्या प्रामाणिकपणाचे चिरनेर गावासह उरण, पनवेल तालुक्यातही कौतुक होत आहे.