कोणत्याही खासगी क्लासला न जाता 95 टक्के
। अलिबाग । वार्ताहर ।
दहावी-बारावीसाठी खासगी कोचिंग क्लासला लाखभर रुपये भरून पास होण्यासाठी झगडणार्या विद्यार्थ्यांना अलिबाग-विजयनगर येथील ओजस संजय पाटील याने कुठलाही खाजगी क्लास न लावता स्वयं अध्ययन करीत बारावीला 95 टक्के गुण पटकावत एक धडा दिला आहे. जनता शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातून शास्त्र शाखेतून बारावीची परिक्षा देणार्या ओजस पाटीलने एकूण 600 पैकी 570 गुण संपादन केले आहेत. जेएसएम कॉलेज तसेच अलिबाग तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान देखील ओजसने पटकावला आहे.
ओजस पाटीलला गणितात 98, भौतिकशास्त्रात 96, रसायनशास्त्रात 94, संगणक विज्ञानात 198 तर इंग्रजी विषयामध्ये 84 गुण मिळाले आहेत. आपल्या यशाबद्दल बोलताना ओजसने सांगितले की, मी कधीही गैरहजर न राहता नियमित सर्व विषयांच्या लेक्चरना उपस्थित राहायचो. विद्यार्थ्यांना संदेश देताना त्याने सांगितले की, तुम्हाला जेवढे आवडेल तितके मनापासून अभ्यास करा. ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. कोचिंग क्लासला येण्या-जाण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा घरीच अभ्यास करून त्यासाठी जास्त वेळ देता येईल, असे त्याने आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे ओजस ने दहावीत देखील सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता. ओजसच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.