। नेरळ । वार्ताहर ।
देशाच्या स्वातंत्र्य समरात सहभागी होऊन आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा विठ्ठलराव तथा भाई कोतवाल यांचे घर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतरदेखील राष्ट्रीय स्मारक बनले नाही.भाई कोतवाल यांच्या घराची स्थिती नाजूक असून त्या ऐतिहासिक घराचा एक भाग कोसळला आहे. दरम्यान, शासनानेदेखील हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती,मात्र अद्याप ती घोषणाच राहिली आहे.
ब्रिटिशांविरुद्ध लढताना दोन जानेवारी 1943 मध्ये भाई कोतवाल यांना हुतात्मा व्हावे लागले. याच हुतात्मा भाई कोतवाल यांच्या कुटुंबाची वाताहत झाली आणि आज त्यांचा रक्ताचा कोणी राहिला नाही. त्यानंतरदेखील माथेरानमधील घोडके आळीमध्ये असलेले घर अनेक समस्यांनी व्यापलेले आहे. राष्ट्र निर्मिती मधील महत्वाचे केंद्र राहिलेले हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर चारही बाजूंनी अडचणीत आहे. त्या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत.15 वर्षापूर्वी या घराची दुरुस्ती व्हावी आणि घरामध्ये राहत असलेले भाडेकरू यांना बाहेर काढण्यासाठी सुधागड बलिदान दिनी जोरदार आवाज उठविण्यात आला होता. त्यावेळी घराची दुरुस्ती करून देण्यात कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल प्रेमींना यश आले होते. मात्र आजही घराच्या अनेक भागात भाडेकरू राहून आहेत. त्यांना बाहेर काढणे कोणाला जमत नाही आणि त्या घराचे राष्ट्रीय स्मारक करणे कठीण झाले आहे.
हुतात्मा भाई कोतवाल यांच्या घराची स्थिती त्यांच्या 112 व्या जयंतीचे दिवशी पुन्हा एकदा समोर आली. घराची एका बाजूने पडझड झाली असून त्याच भागात भाडेकरू यांना घर ताब्यात ठेवले आहे. तसेच राहत असलेल्या भागातील छप्पर पावसाळ्यात आलेल्या वादळात मोडून गेले आहे. हुतात्मा भाई कोतवाल यांची 101वी जयंती साजरी होत असताना माथेरान नगरपरिषद हद्दी मधील घराचे स्मारक करण्यात यावे अशी मागणी होती. यासाठी शासनाने आपल्या अर्थ संकल्पात एक कोटींचा निधी देण्याचे तत्कालीन अर्थ मंत्री अजित पवार यांनी 2013 मध्ये अर्थसंकल्प जाहीर करताना घोषणा केली होती. हा निधी दहा वर्षे लोटली तरी माथेरान नगरपरिषदेकडे आलेला नाही.त्यामुळे राज्य सरकारने केवळ घोषणा केली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हुतात्मा हिराजी पाटील यांचे घरदेखील स्मारकाच्या प्रतिक्षेत
हुतात्मा भाई कोतवाल यांच्या सोबत 2 जानेवारी 1943 मध्ये ब्रिटिशांच्या गोळीचे शिकार बनलेले हिराजी गोमाजी पाटील यांचे कर्जत तालुक्यातील मानिवली गावातील घर देखील स्मारक होण्याची मागणी सरकार अद्याप पूर्ण करू शकले नाही. हुतात्मा भाई कोतवाल स्मारक आणि हिराजी पाटील स्मारक कधी पूर्ण होणार किंवा शासन जाहीर करणार आहे की नाही असा प्रश्न त्यांच्या बलिदानाला 80वर्षे पूर्ण होत असतानादेखील कायम आहे.
सरकार फक्त घोषणा करणार आहे काय...
26 मार्च सन 2012/13 च्या अर्थसंकपात तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणात वीर हुतामा भाई कोतवाल यांच्या माथेरान येथील रहात्या घराचे स्मारक करण्यात यावे. यासाठी ठराव क्रमांक 94 नुसार या स्मारका साठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल अशी घोषणा केली होती. परंतु हा निधी उपलब्ध झाला की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
