। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत त्रस्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सात दिवस चाललेल्या संघर्ष समितीतील उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर महावितरणच्या अधिकार्यांनी समाधानकारक लेखी आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. हे उपोषण जनतेच्या रेट्याने असल्याने कर्जतमधील ऐतिहासिक उपोषण ठरले.
जनतेचे समाधान झाल्यानंतर लोकमान्य टिळक चौकात सात दिवस चाललेल्या उपोषणाची सांगता करताना संघर्ष समितीचे उपोषणकर्ते अॅड. कैलास मोरे, रंजन दातार यांसह कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरणचे जिल्हा अधीक्षक अभियंता आर.बी. माने, कर्जत उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीस महावितरणकडून लेखी आश्वासनांची कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.
सातव्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता सुरू झालेल्या उपोषण सांगता समारंभाचे प्रास्ताविक राजाभाऊ कोठारी यांनी केले. संघर्ष समितीचे रंजन दातार यांनी मान्य झालेल्या मागण्यांवर उपस्थितांना माहिती दिली. या लढ्यात मोलाचे सहकार्य केलेल्या पत्रकारांच्यावतीने राहुल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रणजित जैन, अनिल भोसले, राहुल डाळिंबकर, अॅड. संदीप घरत, अॅड. भावना पवार, अॅड. गोपाळ शेळके, जनार्दन पारटे, सुनील जाधव, मालू निरगुडे, राजेश मुरकुटे, संकेत भासे उपस्थित होते. या सर्वांनी उपोषण कर्त्यांचे अभिनंदन करताना महावितरण अधिकार्यांनी लवकरात लवकर कर्जतकरांना या समस्यातून मुक्त करा, असे आवाहन केले.