सणासुदीच्या तोंडावर कुचंबणा
। पाली-बेणसे । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटलांना मागील तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे सणासुदीच्या तोंडावर त्यांची कुचंबणा होत आहे. परिणामी न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या रायगड जिल्हा पदाधिकार्यांनी नुकतेच रायगड अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे व तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना येत्या काही दिवसात मानधन मिळावे, अशा विनंतीचे निवेदन देण्यात आले.
रक्षाबंधन, गोपाळकाला व गणपती सण आले असून सणासुदीला खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पोलीस पाटलांच्या समोर उभा ठाकला आहे. गणपतीत दिवस-रात्र आपल्या गावात कुठे ही वादविवादाचा प्रकार घडू नये म्हणून पोलीस पाटील आपली कामगीरी बजावत असतात. मात्र, प्रशासनाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहेत. परिणामी पोलीस पाटील प्रचंड नाराज आहेत.
निवेदन देतेवेळी पोलीस पाटील संघटना रायगड जिल्हा कार्याध्यक्ष राम सावंत, उपाध्यक्ष श्रीधर गोळे, सचिव महेश शिरसे, नवी मुंबई अध्यक्ष संजय पाटील, खजिनदार संजय बारस्कर उपस्थित होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिले की तुम्हाला लवकरात लवकर मानधन मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू.
954 पोलीस पाटील मानधनापासून वंचित
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील उरण व पनवेल तालुका वगळता रायगड जिल्ह्यातील उर्वरित सर्व 13 तालुक्यांमध्ये 954 पोलीस पाटील असून त्यांना दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाते. याबाबत आवाज उठवल्यानंतर निधी नसल्याचे कारण सरकार देत आहे.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजाव असतात. हे काम ते अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे करतात. त्यांना शासनाकडून जे काही मानधन मिळते ते तरी किमान वेळेत मिळावे, ही अपेक्षा आहे. हे मानधन मिळण्यासाठी प्रशासनाला विनंती केली आहे.
– श्रीधर गोळे, उपाध्यक्ष, पोलीस पाटील संघटना रायगड जिल्हा