शिकार बेतली तरुणाच्या जीवावर

स्वतःच्या बंदुकीची गोळी लागून मृत्यू

| खोपोली | प्रतिनिधी |

बीड जांबरूग जंगलात मित्रासोबत शिकारीसाठी गेलेल्या जयराम हिंदोळे (29) या तरुणाला स्वतःच्या बंदुकीची गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील बीड जांबरूग गावापासून तीन-चार किलोमीटर अंतरावर आहे. ठाकूरवाडीच्या पुढेच घनदाट जंगलात जयराम हिंदोळे आणि त्याचा मित्र नागेश पारधी हे शिकारीसाठी गेले होते. रात्री 12.30 च्या दरम्यान दोघे घराकडे निघाले होते. उंच उतारावरून खाली उतरत असताना जयरामचा तोल गेल्याने बंदूक दगडावर आपटून गोळी मांडीत घुसली. त्यामुळे जयराम रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. दरम्यान, सोबत असलेला मित्र नागेश घाबरला. त्याने मदतीसाठी ठाकूरवाडीकडे धाव घेतली. गावकऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून जयरामला झोळ्यातून पहाटेच्या सुमारास जंगलातून खाली आणले. दरम्यान, रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्याने प्राण सोडला.

याबाबतची माहिती खोपोली पोलीस ठाण्यात मिळताच पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि संपूर्ण पोलीस घटनास्थळी पोहचून तपास केला असून स्वतःच्या हायगयीपणामुळेच मृत्यु झाला असल्याने आर्म अँक्ट गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शीतल राऊत करीत आहेत.

Exit mobile version