बायकोशी झालेल्या भांडणातून पतीने 10 घरे पेटवली

पाटण | प्रतिनिधी |
सातार्‍यामधील पाटण येथील माजगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरुन भांडण झालं. या भांडणानंतर रागाच्याभरात पतीने स्वत:चे घर पेटवल्याने शेजारच्या नऊ घरांना भीषण आग लागली. या प्रकरणामध्ये काही देणं घेणं नसताना या वाद घालणार्‍या कुटुंबाबरोबरच इतर नऊ संसार जळून उद्धवस्त झालेत.
ही घटना समोवारी सायंकाळी पाच वाजता घडली. आगीचे रौद्र रूप एवढे भयंकर होते की त्यामध्ये सर्वच्या सर्व दहा कुटुंबांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, दागदागिने, रोखड, शेतीची औजारे आदी वस्तू जाळून खाक झाल्या. मात्र सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार येथील संजय पाटील यांचं त्यांची पत्नी पालवी पाटील यांच्याशी कौटुंबिक कारणावरुन घरगुती भांडण झालं. पती पत्नीमधील हा वाद दिवसभर सुरू होता. या भांडणामुळे संतापलेल्या संजय यांनी स्वत:च्या राहत्या घरालाच आग लावली, त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलेंडर्सने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारी राहणार्‍या पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, भिमराव पाटील, दातत्रय पाटील, कृष्णा पाटील, पंढरीनाथ पाटील, गोरखनाथ पाटील व भाडेकरू आनंदराव पाटील यांच्या सर्वांच्या घरांना भीषण आग लागली. दहा घरांना लागलेल्या या भीषण आगीत घरासह पन्नास लाखांहून अधिक नुकसान झालं आहे.

Exit mobile version