प्रचाराच्या तोफा थंडावल्या

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

15 जानेवारीला मतदान; 16 जानेवारील मतमोजणी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 13) प्रचाराची रणधुमाळी थांबली असून, आता सर्वांचे लक्ष 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. प्रचार संपल्यानंतर आता कायदेशीर मर्यादेत ‌‘डोअर-टू-डोअर’ (घरोघरी) प्रचारावर भर दिला जाणार आहे. 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार असून, पनवेलकर सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती देतात, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या निवडणुकीत महायुती (भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट) आणि महाविकास आघाडी (शेकाप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. विशेषतः भाजप आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांच्यातील जुने राजकीय वैर पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही आघाड्यांनी दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती. शेवटच्या दिवशी सभा व रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांचा समावेश होता.

दुसरीकडे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता कायम राखण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. पनवेल हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे शेकापने महाविकास आघाडीच्या साथीने जोरदार तयारी केली आहे. मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्ष उमेदवारांमुळे अनेक प्रभागांत तिरंगी व चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असून, त्याचा फटका मोठ्या पक्षांना बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीला सुरुवातीलाच दिलासा मिळाला आहे. मतदानाच्या दिवशी (15 जानेवारी) शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे. प्रचार संपल्यानंतर सर्व नेते पनवेलमधून परतले असून, खरी कसोटी आता 15 जानेवारीला मतदारांच्या हातात आहे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
पाणी व रस्ते : पनवेलमधील पाणीटंचाई आणि सिडको क्षेत्रातील नागरी सोयीसुविधा चर्चेचा केंद्रबिंदू.
गावठाण विस्तार : स्थानिक भूमीपुत्रांचे प्रश्न व गावठाण विस्ताराचे मुद्दे शेकापने आक्रमकपणे मांडले.
प्रतिष्ठेची लढत : आ. प्रशांत ठाकूर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
Exit mobile version