गेल कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका

मसदमध्ये शेतकऱ्यांच्या भात रोपवाटिका उद्ध्वस्त; खाऱ्या जमिनीत दोन पोकलन अडकल्या

| पेण | प्रतिनिधी |

गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या कामादरम्यान पेण तालुक्यातील मसद ग्रामपंचायत हद्दीत शेतकऱ्यांच्या भात रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. खाऱ्या जमिनीत कंपनीच्या दोन पोकलन यंत्रणा अडकल्यानंतर त्या बाहेर काढण्यासाठी अवजड यंत्रसामग्री थेट शेतातून नेण्यात आल्याने अनेक रोपवाटिका तुडविल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात असताना मसद गावातील खाऱ्या जमिनीत कंपनीच्या दोन पोकलन अडकल्या. त्या बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी खारेपाटाच्या मातीचा योग्य अंदाज न आल्याने मोठी यंत्रे शेतातून हलविण्यात आली. त्यामुळे भाताची लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नुकसान झाल्यानंतरही कंपनी प्रशासन जबाबदारी स्वीकारत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान भरपाईबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांशी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आरेरावीची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. या प्रकरणाची महसूल व कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांचा गॅस पाइपलाइन प्रकल्पाला विरोध नसून, शेतीचे नुकसान होणार असेल तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Exit mobile version