युद्धाचा परिणाम पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्याचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती उद्योगावर आंतरराष्ट्रीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम दिसू लागला आहे. विशेषतः अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, याचा थेट फटका पेणमधील शेकडो मूर्ती उत्पादकांना बसत आहे.

पेण तालुक्यातील गणेशमूर्ती उद्योगाला मोठ्या प्रमाणावर उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले असून, या क्षेत्रातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील सुमारे 80 टक्के रोजगार या उद्योगावर अवलंबून असल्याने, सध्याची परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी पेणमधून लाखो गणेशमूर्ती देशांतर्गत तसेच परदेशात निर्यात केल्या जातात. मात्र, यावर्षी परदेशी ग्राहकांकडून नोव्हेंबरडिसेंबरमध्ये मिळालेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण झाल्या असल्या तरी, वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे त्या वेळेवर पाठविणे कठीण झाले आहे. दरवर्षी सुमारे दोन लाखांहून अधिक मूर्ती 25 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या जातात, ज्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते.

सध्याच्या परिस्थितीत मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तसेच पॅकिंगसाठी आवश्यक असलेल्या बॉक्स, रबर आणि फोमचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर निर्यात खर्चातही मोठी वाढ झाली असून, काही कंटेनर जेएनपीटी बंदरावर अडकून पडल्याने माल वेळेत पोहोचत नाही. या सर्व अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील गणेशमूर्तींचा व्यापार मंदावला असून, परिस्थिती सुधारली नाही तर मूर्तीकार, रंगकाम करणारे कामगार आणि निर्यातदार यांच्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, पेण तालुक्याच्या रोजगार व्यवस्थेवरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Exit mobile version