जलतरणाच्या लाटेवर आत्मविश्वासाचा ठसा

नागावचा समर स्विमिंग कॅम्प यशस्वी; अंतिम दिवशी जलतरण स्पर्धांचा थरार

| चौल | प्रतिनिधी |

पीएनपी सायरस पूनावाला स्कूल, नागाव येथे आयोजित करण्यात आलेला महिनाभराचा समर स्विमिंग कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांनी जलतरणाचे धडे घेत आत्मविश्वास, शिस्त आणि फिटनेसचा अनोखा अनुभव घेतला. सोमवार, दि. 1 जून रोजी कॅम्पच्या समारोपदिनी आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धांनी चुरस निर्माण केली.

दि. 2 मे ते 1 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये 5 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अत्याधुनिक स्विमिंग पूल आणि सुरक्षित वातावरणात मुख्य प्रशिक्षक अमर पाटील व दिनेश मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना जलतरणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

पंधरा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वारिश सागर वाकले याने प्रथम क्रमांक मिळवला. दक्ष केदार गुरव याने द्वितीय, तर शार्दुल अभिजित साखळे याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात मनवा निलेश म्हात्रे हिने प्रथम, ईशा योगेश ठाकूर हिने द्वितीय, तर अस्मी अभिजित पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला. दहा वर्षांखालील गटात क्षितीज निलेश म्हात्रे याने प्रथम क्रमांक पटकावला. मारिया समीर तांडेल हिने द्वितीय, तर मायरा समीर तांडेल हिने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच महिनाभर कॅम्पमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या गितीका भुचर, मुख्य प्रशिक्षक अमर पाटील आणि दिनेश मानकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचा स्टाफ, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

मोबाईल आणि स्क्रीनच्या जगात मुलांना मैदानी उपक्रमांची गरज अधिक आहे. या कॅम्पमुळे मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास वाढला. माझ्या मुलांमध्येही सकारात्मक बदल जाणवला. प्रशिक्षकांनी सुरक्षिततेची घेतलेली काळजी आणि दिलेले वैयक्तिक मार्गदर्शन कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे.

समीर तांडेल,
पालक

कॅम्पच्या सुरुवातीला अनेक विद्यार्थ्यांना पाण्याची भीती होती. काही मुले पहिल्यांदाच स्विमिंग पूलमध्ये उतरली होती. मात्र, महिनाभराच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणानंतर त्यांच्यात झालेला बदल प्रेरणादायी आहे. मुलांनी केवळ पोहणेच शिकले नाही, तर आत्मविश्वास, शिस्त आणि संकटसमयी उपयोगी पडणारे जीवनरक्षक कौशल्यही आत्मसात केले. अंतिम स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखविलेली कामगिरी आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.

अमर पाटील,
मुख्य जलतरण प्रशिक्षक
Exit mobile version