| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीत राहणार्या एका काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने पीडित तरुणीचे आठ वर्षांपूर्वी काढलेले अश्लील व आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकणातील पीडित तरुणी व तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा तिचा चुलत काका हे दोघेही कळंबोलीत राहण्यास आहेत. 2016मध्ये पीडित तरुणी अल्पवयीन असताना काकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. त्यावेळी काकाने पीडित तरुणीचे नग्नावस्थेतील फोटो व व्हिडीओदेखील काढले होते. दरम्यान, पीडित तरुणीचे लग्न झाल्यानंतर ती आपल्या पतीसोबत राहात असताना आरोपी काकाने ते फोटो व व्हिडीओ तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी केली. या प्रकारानंतर पीडित तरुणीने काकाविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.