| अहिल्यानगर | प्रतिनिधी |
भारतीय पुरुष संघाने 7 व्या रोल बॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दुबई येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावचा आणि मुंबई प्राप्तिकर विभागातील साहाय्यक हर्षल सोमनाथ घुगे याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यात हर्षलने केलेल्या तीन महत्त्वपूर्ण गोल्सच्या जोरावर भारताने केनियाचा 11-10 अशा फरकाने निसटता पराभव केला.
सुरुवातीपासूनच भारताचा दबदबा या स्पर्धेत भारतीय संघ सुरुवातीपासूनच अजिंक्य राहिला. साखळी फेरीत भारताने सौदी अरेबियाचा 16-1 आणि ब्राझीलचा 11-2 असा धुव्वा उडवला. या दोन्ही सामन्यांत हर्षलने आपली छाप सोडली. सौदी अरेबियाविरुद्ध त्याने 4, तर ब्राझीलविरुद्ध 3 गोल नोंदवले. या कामगिरीमुळे भारताने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला.
हर्षल पर्वबाद फेरीतील चुरशीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 17-5 असा धुव्वा उडवला. या सामन्यातही हर्षलने 2 गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर उपांत्य फेरीत इजिप्तवर 6-2 अशी मात करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. थरारक अंतिम सामना अंतिम सामन्यात भारत आणि केनिया यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हर्षलने आपल्या अनुभवाचे प्रदर्शन करत 3 महत्त्वाचे गोल केले. हर्षलच्या या कामगिरीमुळे भारताला 11-10 असा विजय मिळवता आला आणि विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले. 2008 पासून रोल बॉल खेळणाऱ्या हर्षलने आतापर्यंत 10 पेक्षा जास्त वेळा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या याच खेळाची दखल घेत जुलै 2024 मध्ये त्याची मुंबई प्राप्तिकर विभागात स्पोर्ट्स कोटा अंतर्गत साहाय्यक पदी नियुक्ती झाली. एका छोट्या गावातून येत जागतिक स्तरावर झेंडा फडकवणाऱ्या हर्षलच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे नाव जगात उंचावले आहे.







