| मुंबई | प्रतिनिधी |
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इतिहास घडवत महिला क्रिकेट वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या विजयानंतर भारतीय संघावर बक्षीसाचा वर्षाव झाला. आयसीसीकडून वर्ल्ड कप विजेत्या संघाला 4.48 मिलीयन अमेरिकन डॉलरचं बक्षीस दिलं जाणार आहे. भारतीय चलनानुसार हे बक्षीस 39.78 कोटी रुपये इतकं आहे. यानंतर आता बीसीसीआयनेसुद्धा अतिरिक्त बक्षीसाची घोषणा केली आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. देवजीत सैकिया म्हणाले की, 1983मध्ये कपिल देव यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकवून देत क्रिकेटच्या नव्या युगाला सुरुवात केली. आज महिलांनीही तोच उत्साह निर्माण केला आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघानं फक्त ट्रॉफी जिंकली नाही तर भारतीयांचं मनही जिंकलं. महिला क्रिकेटर्सच्या पुढच्या पिढीसाठी प्रशस्त असा मार्ग तयार केला. भारताने जेव्हा सेमीफायनलला ऑस्ट्रेलियाला हरवलं तेव्हाच महिला क्रिकेट पुढच्या पातळीवर पोहोचलं होतं.
जय शहा यांनी बीसीसीआयचा कार्यभार सांभाळल्यानंतर महिला क्रिकेटमध्ये अनेक बदल केले आहेत. वेतन समान करण्यावर भर दिला. गेल्या महिन्यात आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी महिलांच्या पुरस्काराच्या रकमेत 300 टक्के वाढ केली. आधी पुरस्काराची रक्कम 2.88 मिलियन डॉलर होती. आता ती वाढवून 14 मिलियन डॉलर इतकी केली आहे. यामुळे महिला क्रिकेटला प्रोत्साहन मिळणार आहे. बीसीसीआयने महिला वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक यांना 51 कोटींच्या बक्षीसाची घोषणा केली. गतवर्षी जेव्हा भारताच्या पुरुष संघाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. दरम्यान, आता बीसीसीआयने महिला संघाला एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 51 कोटी दिल्यानं रकमेतील फरकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.







