| उरण | प्रतिनिधी |
उरण परिसरात पुन्हा एकदा ‘पैसे डबल’ करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारे प्रकार सुरू झाले असल्याचे समोर आले आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी यासंदर्भात नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका, मेहनतीचा पैसा या फसवणुक्यांच्या खिशात जाऊ देऊ नका, असा इशाराही दिला आहे.
काही वर्षांपूर्वी उरणमध्ये पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अनेक नागरिकांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. तरी देखील आजही अशा फसवणुकीच्या चेन पद्धती उरणसह परिसरात कार्यरत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उरण पोलीस ठाण्याच्या वतीने सारडे गावात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत वपोनि हनीफ मुलानी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ही फसवणूक चेनसिस्टीमच्या माध्यमातून केली जाते. सुरुवातीला थोडा परतावा देऊन लोकांचा विश्वास जिंकला जातो, मात्र त्यानंतर लाखो रुपये बुडवले जातात. जोपर्यंत पैसे मिळतात तोवर सर्वजण शांत असतात, पण पैसे थांबताच तक्रारी सुरू होतात. मुलानी यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, अशा फसवणुकीचा व्यवसाय करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पोलीस ठाण्याकडून थारा मिळणार नाही. तसेच, नागरिकांनी संशयास्पद प्रकार त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.







