कादरचा गॉडफादर कोण
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग पोलीस ठाण्यातील कामकाजात कादर नामक व्यक्तीचा हस्तक्षेप प्रचंड वाढत असल्याची चर्चा जोर धरत आहे. हॉकी स्टीकने तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी देखील सेटलमेंटची भुमिका कादरने केल्याची चर्चा आहे. त्यानंतर अलिबागमध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्या झालेल्या अवैध दारु व गुटखा कारवाईत पोलिसांचा खबरी कादरनेच 50 हजार रुपयांची सेटलमेंट केल्याची चर्चा आहे. त्यामुळे कादरचा गॉडफादर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
अलिबाग पोलिसांनी 28 ऑगस्टला रात्री अलिबाग शहरात शिवलकर नाका जवळ एक छापा टाकला होता. या छाप्यात एका व्यक्तीकडे देशी, विदेशी दारुच्या साठ्यासह गुटखा आरएमडीसारखे तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. मात्र, साहेबांना 50 हजार रुपयांची चहापाणी द्यावे लागेल असे सांगून कादरने अवैध धंदेवाल्याकडून 50 हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. मात्र, ते पैसे साहेबांपर्यंत पोहचले की नाही, हा एक चर्चेचा विषय बनला आहे. ज्या व्यक्तीवर पोलिसांनी छापा टाकला. त्या व्यक्तीला छापा टाकण्याच्या चार दिवस अगोदर कादरनेच गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी दिले होते, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे कादरने गुटखा नक्की कुठून आणला. अवैध गुटखा बंदी असताना त्याने गुटख्याची तस्करी केली कशी अशा अनेक प्रकारचे प्रश्न जनमानसातून उमटत आहेत. त्यामुळे खबरीच गुटखा व अन्य तंबाखू जन्य पदार्थ विक्रीस प्रोत्साहन करीत असताना पोलीस कादरविरोधात भुमिका का घेत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कादरचा गॉडफादर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याला अलिबाग पोलीस ठाण्यात इतका सन्मान का दिला जात आहे. अशा अनेक प्रकारच्या चर्चेला उत आला आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगडचे सुत्र हाती घेतल्यावर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात कडक पावले उचलली. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना दिले. त्यामुळे अवैध धंद्यावर लगाम बसला. धंदे चालू करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. पोलीस अधीक्षक यांच्या दणक्याने अवैध धंद्यावर अंकुश राहिला असल्याचे चित्र आहे. मात्र, अलिबाग पोलीस ठाण्यातील कारवाईच्या कामकाजात खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप वाढला आहे. या प्रकरणामुळे पोलीस ठाण्यात खबरी बरोबरच दलाली करणाऱ्याचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा आहे.
