मंत्री रवींद्र चव्हाण कधी येणार, नेटकर्यांना प्रतीक्षा
| रायगड | खास प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचे धिंडवडे रोज समाजमाध्यमांवर काढले जात आहेत. सरकार, मंत्री, खासदार, आमदारांपासून सरकारी अधिकार्यांना अनेक दुषणे दिली जात आहेत. काहीच दिवसांपूर्वी रायगड-रत्नागिरीचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी या महामार्गाची पाहणी केली. त्यांच्याच राजवटीत महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या 12 वर्षांत हे काम काही पूर्ण झालेले नाही. ‘साहेब, झाला का तुमचा पाहणी दौरा, दरवर्षी तुम्ही पाहणी करता, मात्र उपयोग शून्य होतो.’ खासदार तटकरे यांच्यानंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी दौर्यांची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, त्यामुळे फारसा काही फरत पडलेला नसल्याने नेटकर्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये या महामार्गाचे वास्तव अधिक गडद असल्याचे दिसते. या मार्गावरुन प्रवास करणार्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महार्मागावर भले मोठे खड्डे पडले आहेत. काही मार्ग तर चिखलात रुतल्याचे दिसते. रस्त्यांची पातळी समान नसल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. याचा त्रास वाहन चालकांसह प्रवाशांना अधिक होत आहे. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून 84 कि.मी.च्या मर्गासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. मुंबई-गोवा महामार्गावर 2500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
काहीच दिवसांनी गणेशोत्सवाला सुरु होणार आहे. या कालावधीत लाखोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरुन आपापल्या गावी सण साजरा करण्यासाठी जातात. त्यांचा प्रवासदेखील नेहमीप्रमाणेच खडतर होणार असल्याचे दिसून येते. काहीच दिवसांपूर्वी खासदार तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. खारपाडा, इंदापूर, लोणेरे आणि माणगाव या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणेच विविध अडचणींचा पाढा वाचला. त्यामध्ये त्यांनी ठेकेदारांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालादेखील टार्गेट केल्याचे दिसले. परंतु, सरकार तुमचेच आहे साहेब… मग घोडे कोठे अडतंय, याची विचारणा जनता करणारच. खासदार तटकरे यांनी आता पुन्हा महामार्गासाठी 31 डिसेंबर 2024 मध्ये काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास पुन्हा खड्ड्यांतूनच होणार हे स्पष्ट आहे.
गेल्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचे काम पूर्ण केल्याचे श्रेय भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतले होते. त्यांच्या कार्याचे गोडवे गाणारे बॅनर त्यावेळी जागोजागी लावण्यात आले होते. खासदार तटकरे यांच्यानंतर आता मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा कधी होणार याची वाट आता नेटकरी बघत आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण त्यांना करुन देण्यासाठी कदाचित नेटकरी उत्सुक असावेत.