कामगारांचे हित हाच ध्यास – आ. जयंत पाटील यांची ग्वाही

आर.सी.एफ कर्मचारी सेनेकडून गौरव

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

कामगार संघटना ही कामगारांच्या हितासाठीच काम करणारी असली पाहिजे. पूर्वीच्या संघटनेने आर.सी.एफ कामगारांच्या सुविधा कमी करण्याशिवाय काही केले नाही. असे होता कामा नये. युनियनमध्ये अंतर्गत संघटना होता कामा नये. त्यामुळे संघटनेचे महत्व कमी होते. भविष्यात होणार्‍या भरतीत स्थानिकांना महत्व देतानाच पीएपींना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कामगारांचे हित हाच आपला ध्यास असेल, अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिली. शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यावर आर.सी.एफ कंपनीत झालेल्या कामगार संघटना मान्यताप्राप्त निवडणुकीत आर.सी.एफ कर्मचारी सेनेचा मोठा विजय झाला. त्याबद्दल आ. जयंत पाटील यांचा तसेच जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील आणि विजयाचे शिल्पकार शेकाप कामगार सेलचे अध्यक्ष प्रदीप नाईक यांचा शेतकरी भवन येथील सभागृहात शनिवारी (दि.27) गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कर्मचारी सेनेचे जनरल सचिव दत्ता परब, दिनेश कवाडे, सतिश निकाळजे, सोनवणे, संजय माळी, राजन ठाकूर, अशोक म्हात्रे, मनोज घरत, सुधिर दाते, विनोद रुईकर, श्रीरंग कटोर, प्रसन्ना कटोर, चित्रसेन कटोर, पद्माकर थळकर आदी उपस्थित होते. यावेळी संजय पाटील, सुरेश घरत, संदीप घरत, अ‍ॅड. परेश देशमुख, अजित माळी, रविंद्र म्हात्रे आदींचाही सत्कार करण्यात आला.

यापुढे आ. जयंत पाटील यांनी संवाद साधताना म्हटले की, आपण दिलेला शब्द कधीच फिरवत नाही. मग त्यात फायदा आहे की नुकसान याकडे देखील पाहत नाही. यापुढे एकत्र काम करु. मुंबईत कामगारांच्या प्रश्‍नासाठी सोबत येण्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले.

जे कठीण आहे, त्यातच लढायला खरी मजा येते. तिथेच विजय मिळवून ताकद दाखवून द्यायची असते. आपले व्यक्तिगत संबंध हीच ताकद आहे. गटबाजी होता कामा नये. एप्लॉयमेंटला युनियनच्या जोरावर अग्रस्थान लावा. युनियनसोबत आहे हे प्रत्येकाला कळले पाहिजे. असेही ते म्हणाले. आजच्या विजयामुळे थळ मतदार संघात आणि परिसरात आपली ताकद वाढणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आता आमच्यापाठी भाई आहेत. त्यामुळे थळमध्ये आम्ही कधीच मागे पडणार नसल्याचा विश्‍वास श्रीकांत परब यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक करताना शेकाप कामगार सेलचे अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी आर.सी.एफ मध्ये यापुढे शेकाप आणि आर.सी.एफ कर्मचारी सेना खांद्याला खांदा लावून काम करेल, असा विश्‍वास व्यक्त केला. कामगार हिताला प्राधान्य देताना कोणावरची अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आरसीएफमध्ये स्थानिकांना शेकापमुळे नोकर्‍या मिळाल्या. व्यक्तिगत कुणालाच त्रास द्यायची आपली मानसिकता नाही. यापुढे होणार्‍या नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच पीएपींना सर्वप्रथम प्राधान्यक्रम मिळाला पाहिजे. बाहेरच्या लोकांना एकत्र करा. कामगारांना संघटनेच्या माध्यमातून नैतिकता आणि हिम्मत देण्याचे काम करा.

आ. जयंत पाटील

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही
शेकापने उघडपणे निवडणुकीत भाग घेतलेली ही पहिली निवडणूक आहे. त्यातून शेकापची ताकद दिसली. एक विचार घेऊन काम करु. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. शेकापनेच सर्वप्रथम माथाडींना टेंडर भरु न देता थेट काम देण्याची मागणी केली. संघटनात्मक चांगला बदल झाला असल्याने कामागारांची देखील हिंमत वाढून न्याय मिळेल, असे वातावरण तयार करा अशीही सुचना आ. पाटील यांनी यावेळी केली.

आ. जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहील
सरचिटणीस दत्तात्रय परब यांनी मनोगतात आ. जयंत पाटील यांना धन्यवाद देताना यापुढे बाहेरच्या माणसाला प्रवेश देणार नाही. यापुढे आ. जयंत पाटील यांचेच वर्चस्व राहिल, अशी ग्वाही दिली. तसेच पुढल्या वेळी दुसर्‍या युनियच्या प्रचाराची वेळच येता कामा नये, असेही ते म्हणाले.

Exit mobile version