आखाती युद्धाच्या आयपीएलला झळा

एका सामन्यासाठी 2500 लीटर डिझेलची गरज, खेळाडूंच्या प्रवासावरही परिणामाची शक्यता

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आखाती युद्धामुळे युरोप, अमेरिका अर्थातच पश्चिमेकडील देशांतून येणाऱ्या परदेशातील क्रिकेटपटूंच्या प्रवासावर परिणाम होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचा हॉटेल उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याचेही आव्हान असेल, त्याचबरोबर या युद्धामुळे जाहिरातीच्या उत्पन्नावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. वर्ल्ड कप स्पर्धेची सांगता झाल्यानंतर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे प्रयाणाचा प्रश्न निर्माण झाला होता. आंतरराष्ट्रीय संघ असल्यामुळे या संघाच्या प्रयाणासाठी चार्टर विमानाची सोय करण्यात आली होती. मात्र, आयपीएल खासगी आहे. त्यामुळे संबंधित देशांतील खेळाडूंच्या प्रवासासाठी चार्टर विमानाची सोय होणार नाही, याचा परिणाम खेळाडूंच्या आगमनावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. तूर्तास अफगाणिस्तानमधील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका; तसेच खेळाडूंच्या सहभागाचा प्रश्न येणार नाही, असे सांगितले जात आहे. सध्या काही प्रमाणात विमानसेवा सुरू आहे. मात्र, त्यात कधीही प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विद्युतझोताचाही प्रश्न
आयपीएलमधील 90 टक्के खेळ विद्युतझोतात होत असतो. दुपारी तीनची लढत असली तरीही सामन्याची सांगता विद्युतझोतात होत असते. एका आयपीएल सामन्यासाठी किमान दोन ते अडीच हजार डिझेल लागते. त्याशिवाय सरावाच्या वेळीही जनरेटरचा वापर होतो. युद्धामुळे हे डिझेल उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतो. गुवाहाटी (डॉ. भूपेन हझारिका स्टेडियम), बेंगळुरू (चिन्नस्वामी स्टेडियम), कटक (बाराबती स्टेडियम) येथे डिझेलच्या जनरेटरचा वापर होतो.
जाहीरात उत्पन्नही घटणार?
आयपीएलचे सहपुरस्कर्ते, तसेच काही संघाचे सहपुरस्कर्ते पश्चिम आखातामधील कंपन्या आहेत. त्या कंपन्या पुरस्कृत राहण्याबाबत फेरविचार करू शकतात. त्यामुळे आयपीएलच्या उत्पन्नातही घट होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Exit mobile version