पाटबंधारे खात्याने भूभाडे द्यावे

कोंढाणे धरण भागातील शेतकर्‍यांची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात उल्हास नदीवर कोंढाणे येथे मध्यम धरण बांधले जाणार आहे. त्या ठिकाणी स्थानिकांच्या शेतीला पाणी मिळणार आणि उन्हाळ्यात कोरडी असलेली उल्हास नदी वाहती होणार होती. या एकमेव उद्देशाने स्थानिक शेतकर्‍यांनी धरणाच्या कामासाठी आणलेली मशीन ठेवण्यासाठी तसेच धरणाचे काम करण्यासाठी जमीन दिली होती. मात्र, 2011 पासून त्या जमिनीवर पाटबंधारे खात्याने कोणतेही काम केले नाही आणि आमच्या शेतकर्‍यांच्या जमिनी अडवून ठेवल्या आहेत. त्याबाबतचे भूभाडे पाटबंधारे विभागाने तात्काळ संबंधित शेतकर्‍यांना द्यावे, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

2011 साली कोंढाणे धरणाचे काम सुरु झाले. आपल्या परिसराचा विकास व्हावा, शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने स्थानिक शेतकर्‍यांनी पाटबंधारे खात्याला जमिनी देण्याचा निर्णय घेतला होता. कोंढाणे, चोची, उंबरवाडी आणि मुंडेवाडी येथील शेतकर्‍यांनी जमिनी देताना आपल्या भागातून वाहणारी उल्हास नदी वाहती होईल, त्याचप्रकारे नदीमध्ये पाणी असेल तर शेती करता येईल आणि आर्थिक स्तर उंचावता येईल या उद्देशाने जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत शेतकर्‍यांना रेडी रेकनरच्या 10 टक्के भूभाडे देण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने जाहीर केले होते. मात्र, धरणाचे काम सुरु झाले आणि काम बंददेखील पडले असून, धरणाचे काम करीत असताना करण्यात आलेल्या मातीच्या भरावाखाली अनेक जमिनी गेल्या आहेत. धरणाच्या भरावाखाली जमिनीमध्ये 15 ते 20 फूट खोदल्यामुळे त्या ठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून या तीन गावांतील शेतकर्‍यांना शेती करता आली नाही.

त्यामुळे शेती गेली आणि मोबदलादेखील नाही, अशा स्थितीत कोंढाणे, चोची आणि उंबरवाडी येथील शेतकरी असून, आपल्या वापरलेल्या जमिनीचे भूभाडे शासनाने द्यायला हवे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्यामुळे मागील 12 वर्षांचे भूभाडे म्हणून पाटबंधारे खात्याने एकरी एक लाख रुपये भूभाडे म्हणून द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कर्जत प्रांत अधिकारी अजित नैराळे यांना निवेदन देऊन केली आहे. ही बाब लक्षात घेऊन सकारात्मक कारवाई कराल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. याप्रसंगी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम, युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, हरिश्‍चंद्र मांडे मंगेश फुलावरे उपस्थित होते.

Exit mobile version