आश्वासने आणि आणखी आश्वासने
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल कंपनी प्रशासनाविरोधात लढा देणाऱ्या प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबरपर्यंत हा प्रश्न मार्गी न लागल्यास कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष नीलेश गायकर यांनी दिला आहे.
प्रकल्पग्रस्तांनी 15 सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरु केले होते. 3 ऑक्टोबरला कामबंद आंदोलन करण्यात येणार होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या समवेत बैठक झाली. पुढील बैठक गुरुवार दि. पाच ऑक्टोबरला होणार होती. ती पुढे ढकलून 6 ऑक्टोबरला घेण्यात आली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नीलेश गायकर, दत्तात्रेय ठाकूर, अनंत शिंदे, निखील पाटील, अशिष नाईक, योगेश गुजर, भरत नाईक, सचिन मोरे, प्रमोद धसाडे, रुपेश शिंदे, अमित घरत, जिगर शिंदे, भूषण शिंदे, सौरभ दमामे आदी संघटनेचे पदाधिकारी, गेल कपंनीचे अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीतही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पुन्हा बैठक घेण्याबाबत चर्चा झाली.
10 ऑक्टोबरच्या बैठकीत लेखी आश्वासन दिले जाईल असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात या आश्वासनाची अंमलबजावणी कशी होणार हे अस्पष्ट आहे. त्यामुळे मंगळवारी मागण्यांची दखल न घेतल्यास 11 ऑक्टोबरला कामबंद आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे.