कंपनीत डिझेल, पेट्रोलची तस्करी?
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीत पॉलीमार प्रकल्पाचे काम सूरू आहे. कामासाठी लागणारे माल मोठ मोठ्या वाहनांद्वारे कंपनीत आणले जात आहे. मात्र, चालकाला हाताशी धरून काही मंडळी या मोठ्या वाहनामधून पेट्रोल, डिझेल तस्करी केली जात आहे. सुरक्षा रक्षकांना चकवा देत 15 ते 20 लीटरच्या ट्रममध्ये भरून तो साठा अन्य वाहनांद्वारे बाहेर काढला जात आहे. या प्रकारामुळे कंनपीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भारत सरकारच्या पेट्रोलिअम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली गेल कंपनी काम करीत आहे. उसर येथे गेल कंपनी असून या कंपनीच्या दुसऱ्या टप्प्यातील पॉलिमार प्रकल्पाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरु आहे. प्लास्टीकचे उत्पादन करणारा देशातील सर्वात मोठा हा प्रकल्प असणार आहे. 11 हजार 256 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम 2021 पासून सुरू झाले.आतापर्यंत 70 टक्केपेक्षा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. 2026 पर्यंत प्रकल्पाचे पुर्ण करण्यासाठी युध्द पातळीवर काम सूरू आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी स्थानिकांसह वेगवेगळ्या राज्यातून कामगार दाखल झाले आहेत. अंदाजे तीन हजारहून अधिक कामगार या कंपनीत काम करीत आहेत. राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प आहे. प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा देशातील पहिला प्रकल्प असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे एक वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. प्रकल्पाचे काम चांगल्या पध्दतीने व्हावे, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कंपनीच्या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कंपनीतील सुरक्षा राखण्याचे काम केले जात आहे. कंपनीत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांबरोबरच कामगारांचीदेखील तपासणी सुरक्षा रक्षकांच्या मार्फत केली जात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे. मात्र तरीदेखील या कंपनीत सुरक्षा रक्षकांना चकवा देत डिझेल, व पेट्रोलची तस्करी होत असल्याची चर्चा आहे. मोठ मोठ्या वाहनांमधून 15 ते 20 लीटर पेट्रोल, डिझेल काढून एका ड्रममध्ये भरले जातात. तो भरलेला ड्रम एका रिकाम्या ट्रक, जेसीबी, पोकलन, हायवाद्वारे बाहेर आणून पेट्रोल, डिझेल विकला जात आहे.
जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा समुद्रकिनारी डिझेल तस्करीच्या घटना घडत असताना कंपनीमध्येदेखील डिझेल, पेट्रोलची चोरी होण्याच्या घडत आहेत. कडक पहारा असताना कंपनीतून डिझेल, पेट्रोलची चोरीच्या घटना घडत असल्याने सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापुर्वी कंपनीतील काही साहित्यांचीदेखील चोरी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन याकडे गांभीर्योन लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अवैध दारु विक्री जोरात
गेल कंपनीमध्ये वेगवेगळ्या भागातून कामगार कामासाठी आले आहेत. दिवसभर काम केल्यावर काही कामगार मद्यपान करण्यावर भर देतात. त्यामुळे उसर परिसरात ठिकठिकाणी अवैध दारु विक्रीचा व्यवसाय छुप्या पध्दतीने सुरू आहे. रेवदंडा पोलिसांना माहित असताना ही त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही. या अवैध दारु विक्रेत्यांना पोलिसांकडून अर्थपूर्ण सहकार्य मिळत असल्याची चर्चा जोरात आहे. चढत्या दराने देशी, विदेशी दारुच्या बाटल्या विकल्या जात आहेत.
गैरप्रकार, चोरी व अनुचित प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी कंपनीत स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची व कामगारांची तपासणी केली जाते. तरीदेखील कंपनीतील मोठ्या वाहनांमधून पेट्रोल, डिझेलची चोरी होण्याचा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल जाईल.
जितेन सक्सेना- महाव्यवस्थापक, मानव संसाधन
गेल कंपनी







