| रसायनी | प्रतिनिधी |
खैराट गावातील सॉल्ट रिसोर्ट ॲड ओलियंडर फार्म येथून एकूण 18 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने चोरट्यांनी लांबविले होते. खालापूर पोलिसांनी शिताफीने तपास करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. मयूर किसन आगिवले (24), प्रविण कृष्णा सगणे (25), ओमकार दत्ता सरोदे (25) अशी त्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे एका विवाह सोहळ्याकरीता आले असता त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी खैराट गावातील सॉल्ट रिसोर्ट ॲन्ड ओलियंडर फार्म येथे राहण्याकरीता रूम घेतला होता. या रूममध्ये त्यांना किंमती वस्तू, दागिने व रोख रक्कम ठेवण्यासाठी लॉकर दिला होता. त्या लॉकरमध्ये त्यांनी त्यांच्याकडील दागिने व रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवून सभारंभाकरीता गेले होते. यादरम्यान तिघांनी रूममध्ये प्रवेश करून मास्टर पासवर्डने लॉकर उघडून लॉकरमधील 18 लाख 70 हजार रूपये किंमतीच्या सोन्याचे व हिऱ्यांच्या दागिन्यांसह व 6 हजार 500 रुपयांची रोखरक्कम चोरून नेली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोणताही पुरावा नसतानाही खालापूर पोलिसांनी तांत्रिक तपास करून संबंधित रिसॉर्टमधील रेपीत क्र. 1, 2 सिक्युरिटी गार्ड आणि रूमबॉय यांची चौकशी केली. या तपासात त्यांनी गुन्ह्याची कबूली दिल्याने त्यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दागिने चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
