कोकण रेल्वेचा प्रवास होणार गतीमान

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी ते वेर्णा या टप्प्यातील कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्याची अंतिम टप्प्यातील रेल्वे सुरक्षा यंत्रणेकडून (सीआरएस) 22 व 24 मार्च रोजी तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच सर्व गाड्या विजेवर धावणार आहेत
गेली सहा-सात वर्षे कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. गेल्याच महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव-थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपासणी केली होती. त्याआधी कारवार-ठोकूर तसेच रोहा-रत्नागिरी विद्युतीकरण टप्पे पूर्ण केले गेले. तेथील सीआरएस निरीक्षणदेखील पूर्ण झाले आहे. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्यामुळे सध्या रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जात आहे.कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गापैकी रत्नागिरी ते वेर्णा या अंतिम टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाल्यामुळे या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून 22 व 24 रोजी तपासणी केली जाणार आहे. यासाठी सात बोगी असलेली सीआरएस विशेष गाडी 21 मार्च रोजी रात्री 11 वाजता सीएसटीहून कोकण रेल्वे मार्गांवर येण्यासाठी रवाना होईल.

Exit mobile version