कोकणकरांचा प्रवास होणार सुखकर

आंबेत पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार

| आंबेत | वार्ताहर |

कोकणातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा समजला जाणारा आंबेत सावित्री खाडीवरील पूल गेली तीन वर्षे वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे कोकणातील प्रामुख्याने विकसित असलेल्या पर्यटन विकासाला याचा मोठा फटका बसला. आंबेत पुलाचे दुरुस्तीचे काम करत असलेल्या पिलानी इन्फ्रा प्रायव्हेट कंपनीने हे काम आता मोठ्या शिताफीने करून दाखवलं आहे. दुरुस्तीचा वेगदेखील वाढला असून, उर्वरित कामाची स्थिती पाहता हे पूल येत्या गणपती सणाअखेर सुरू होणार असल्याचे संकेत कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विलास पिलानी यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी वार्तालाप करताना व्यक्त केलं, त्यामुळे लवकरच कोकणकरांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

पुलाचे काम करीत असलेल्या पिलानी अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिवसरात्र काम करण्याचे ध्येय आखले असून 15 सप्टेंबर रोजी इंजिनियर डे ला ही कंपनी कोकणकरांना पूल वाहतुकीसाठी खुला करणार आहे, त्यामुळे कोकणकरांची चिंता कायमची मिटणार आहे. पुलाच्या मुख्य स्लॅबचा भाग हा आता पूर्वपदावर असून, उर्वरित काम हे येत्या काही दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण कोकणकरांना लागून राहिलेली आंबेत पुलाची चिंता आता मिटणार असून, वाहतुकीचा मार्ग हा तब्बल तीन वर्षांनंतर खुला होणार हे निश्चितच. कोकणाला पुन्हा पर्यटन विकासाला चालना देण्यास मदत करेल.

अफरोजा डावरे, सरपंच, आंबेत
Exit mobile version