महाड-पंढरपूर महामार्गाचा प्रवास खड्डेमय

ग्रामस्थांमधून संताप,आंदोलनाचा इशारा
| महाड | प्रतिनिधी |
महाड- म्हाप्रळ- पंढरपूर रस्त्याच्या सध्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. गेली कांही महिने ठप्प झालेले काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत पुन्हा एकदा चालू असले तरी महाड ते वराठी, महाप्रळ पर्यंत खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. या भागातून ये जा करत असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत असून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मुजोरपणा बाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्याविरोधात आंदोलनाची तयारी चालू केली आहे.

म्हाप्रळ पंढरपूर हा राज्यमार्ग . क्रमांक 15 हा महामार्ग महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठी पासून सुरवात होवून तालुक्यातील शिरगाव, पुढे खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत त्याचा प्रवेश होतो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरूस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग महामार्ग विभागाकडे वर्ग झाला असून आता हा मार्ग 965 डी.डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी चार वर्षापूर्वी सुरवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले होते. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचे देखील काम घेतले होते. हे काम अर्धवट ठेवल्याने सदर ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड -महाप्रळ -पंढरपूर मार्गाचे काम देखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. सद्या हे काम अक्षय कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प होते. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोर्‍यांची कामे,. यामुळे हा रस्ता प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहे.

महाड तालुक्यातील शिरगाव, पासून पुढे तुडील गावापर्यंत जुना डांबरी रस्ता कांही अंशी बरा होता मात्र त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने . तात्पुरती मलमपट्टी करून केल्याने हा संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. . या परिसरातील ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे करून देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे महाड येथील कार्यालय ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने या परिसरातील ग्रामस्थ रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्यापासून ते रस्त्यावरील खड्डे वारंवार होणार्‍या अपघात यामुळे त्रस्त झाली आहेत . ज्या पुढार्यांना येथील जनतेने निवडून दिले ते देखील ठेकेदाराचे बगल बच्चे झाले असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी, ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत यामुळे ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

Exit mobile version