15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर रूळावर; पर्यटकांनी व्यक्त केला आनंद
| नेरळ/माथेरान | प्रतिनिधी |
पर्यटकांची लाडकी समजली जाणारी माथेरानची राणी म्हणजेच नेरळ-माथेरान मार्गावर धावणारी मिनीट्रेन अखेर शुक्रवार, दि.30 ऑक्टोबर पासून रूळावर आली. यावेळी तिच्या स्वागतासाठी स्थानिक तसेच पर्यटकांनी माथेरान स्थानकात गर्दी केली होती. पहिल्या फेरीच्या वाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असला तरी पर्यटकांनी पहिल्या गाडीच्या प्रवासाचा आनंद घेतला. यादरम्यान, फुलांनी सजविलेल्या या गाडीचे फोटो काढण्यासाठी तर कुणी सेल्फी घेण्यासाठी गर्दी करताना दिसत होते.
ब्रिटिश काळात सुरू झालेली नेरळ-माथेरान मार्गावर चालविली जाणारी मिनीट्रेन शुक्रवारी पुन्हा एकदा प्रवासी सेवेत आली. ब्रिटिश काळापासून घाट सेक्शनमधील धोका टाळण्यासाठी पावसाळ्यात माथेरानची राणी म्हणजेच मिनीट्रेन बंद ठेवली जाते. त्यानंतर दि.15 ऑक्टोबर रोजी मिनीट्रेन सुरू होत असते. मात्र, यंदा तब्बल 15 दिवस उशिराने नेरळ-माथेरान प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. तत्पुर्वी मिनीट्रेनची गुरूवारी (दि.29) नेरळ-माथेरान मार्गावर चाचणी घेण्यात आली. ती चाचणी यशस्वी ठरल्यानंतर शुक्रवारी लगेच नेरळ येथून माथेरानसाठी मिनीट्रेन सुरू करण्यात आली. त्याआधी येथील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिनीट्रेनसमोर भंडारा उधळला. त्यानंतर स्टेशन मास्टर गुरुनाथ पाटील यांनी मिनीट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मध्य रेल्वे वाहतूक निरीक्षक अरुण प्रीतम, सेक्शन इंजिनियर अनिल कुमार आणि शाखा अभियंता शरद सानप आदी उपस्थित होते. तसेच, या हंगामातील सकाळी 850ः वाजता निघालेल्या पहिल्या गाडीचे सारथ्य मोटरमन नरेश भोईर आणि सहायक म्हणून जगदीश कराळे यांनी केले. तर, या पहिल्या गाडीचे गार्ड म्हणून रंजीत कुमार यादव, तर तिकीट तपासनीस म्हणून एस.जे. भगत यांनी जबाबदारी पार पाडली.
नेरळ स्थानकातून सकाळी 850ः वाजता निघालेली मिनीट्रेन 21 किलोमीटर लांबीच्या पर्वतीय मार्गावरील ज्यूम्मापट्टी, वॉटर पाईप आणि अमन लॉज या तीन स्थानकांसह तब्बल 219 वेडीवाकडी वळणे आणि दोन लहान बोगदे पार करत माथेरान येथे सकाळी साडेअकरा वाजता पोहचली. परंतु, सध्या सुरू असलेल्या परीक्षांचा हंगाम लक्षात घेता मिनीट्रेनच्या पहिल्या फेरीला प्रवाशांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. यावेळी केवळ 28 प्रवाशांनी पहिल्या गाडीचे तिकीट मिळवले असून, प्रथम श्रेणीचे तिकीट कोणीही काढले नाही. त्यानंतर नेरळ स्थानकातून सकाळी 10.25 वाजता निघालेली मिनीट्रेन दुपारी साडेबारा वाजता माथेरान स्थानकात पोहचली. यावेळी माथेरान स्थानकात उपस्थित असलेले प्रवासी, स्थानिक आणि व्यावसायिक यांनी माथेरानच्या राणीचे जल्लोषात स्वागत केले.
पारेख कुटुंबिय ठरले पहिले प्रवासी
हिवाळी पर्यटन हंगामाची सुरुवात नेरळ येथून मिनीट्रेनच्या प्रवासी वाहतुकीने झाली. यावेळी माथेरान येथे पहिल्यांदाच पर्यटनासाठी आलेले विनय पारेख हे सहकुटुंब नेरळ स्थानकात पोहचले. तेंव्हा मिनीट्रेन जाणार असल्याची उद्घोषणा ऐकली. तात्काळ ते मिनीट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी तिकीट खिडकीवर पोहचले. त्यावेळी तेथील बुकिंग कार्यालयातील प्रमुख के.जी. विनोद आणि बुकिंग क्लार्क संतोष महाले यांनी या पहिल्या प्रवाशाचे स्वागत केले. त्यावेळी तिकीट मिळवल्यानंतर आपण पहिले प्रवासी आहोत याचा आनंद या कुटुंबाने व्यक्त केला.
विस्टा डोम रिकामाच
नेरळ-माथेरान मिनीट्रेनमधून जास्तीत जास्त संख्येने प्रवाशांनी प्रवास करावा म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या गाडीला विस्टा डोम डब्बा बसवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, यावेळी पहिल्या गाडीला जोडण्यात आलेल्या विस्टा डोम डब्यातून एकही प्रवाशाने प्रवास केला नाही. त्यामुळे या डब्याचे महागडे तिकीट कोणी घेत नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
नेहमी 15 ऑक्टोबर दरम्यान मिनीट्रेनची सेवा उपलब्ध होते. परंतु, यावेळी आवडत्या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी आम्हाला पंधरा दिवस उशिरा संधी मिळाली. मुलांची हौस यानिमित्ताने पूर्ण झाली. सध्या या ट्रेनच्या दोनच फेऱ्या होत आहेत. त्यामध्ये वाढ झाल्यास सर्वांनाच या ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेता येईल.
चंद्रशेखर शिंदे,
पर्यटक, मुंबई
