रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा पत्रकारांना उलट सवाल; रिसॉर्टवर सभा घेतली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? म्हणत खर्चाच्या प्रश्नावरून नवा वाद!
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात जनता पाण्यासाठी वणवण करतेय, शेतकरी दुष्काळाच्या संकटात होरपळतोय, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट गडद होतंय… धरणांमधील पाणीसाठा कमी होतोय…पण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी निवड झाली ती चक्क पनवेलच्या विसावा रिसॉर्टची! काय गरज होती? हा साधा सरळ प्रश्न कृषीवलने अध्यक्षांना विचारला तर त्यांना प्रॉब्लेम झाला? 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या या सभेवर किती खर्च झाला? शासकीय सभागृह उपलब्ध नव्हते का? जनतेच्या पैशांची बचत करण्याचा विचार का झाला नाही? असे साधे प्रश्न उपस्थित केले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय बनलं आहे.
अध्यक्ष म्हणतात, जिल्हा हा 15 तालुक्यांचा आहे, कोण्या एका तालुक्याचा नाही. दुष्काळ आणि या सभेचा काहीही संबंध नाही. ही जनरल सभा आहे. आम्ही दर तीन महिन्यांनी सभा घेतो. आम्ही रिसॉर्टवर सभा घेतली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? आम्ही काय तिथे एन्जॉयमेंट करायला चाललो नाही!
पण अध्यक्ष महोदय, प्रश्न सभेचा नाही… प्रश्न आहे सभेच्या ठिकाणाचा आणि त्यावर होणाऱ्या खर्चाचा! जनतेला काटकसरीचे धडे द्यायचे आणि सार्वजनिक पैशांच्या खर्चाबाबत प्रश्न विचारला की उलट पत्रकारांनाच सवाल करायचा?
15 तालुक्यांचा जिल्हा आहे, हे मान्य! पण 15 तालुक्यांच्या जनतेच्या पैशांचा हिशेब देण्याची जबाबदारीही तुमचीच आहे ना?
रिसॉर्टमध्ये सभा घेण्यास विरोध नाही; मात्र त्या सभेचा खर्च किती, तो कोणत्या निधीतून केला आणि शासकीय पर्याय का निवडला नाही, याची माहिती जनतेला मिळालीच पाहिजे….कारण रिसॉर्टमध्ये सभा घेण्याचा निर्णय तुमचा असू शकतो; पण त्या खर्चाचा हिशेब मागण्याचा अधिकार जनतेचा आहे….त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत असा गरज नसताना खर्च होणार असेल, तर प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे. आज रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून गरिबांना किडे, मुंग्या दिल्या जाता आहेत, अनेक गावांत टँकरही पोहोचले नाहीत, दुष्काळासह आरोग्य, पोषण आहार अशा अनेक समस्या समोर उभ्या आहेत, हे सगळं असताना रिसॉर्टमध्ये जाऊन काय साध्य करायचं होतं….
अध्यक्ष साहेब सांगतात आम्ही एन्जॉयमेंट करायला गेलो नाही, पण नेमकं काय करायला गेलात हे सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं नाही…त्यामुळे सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करणं बंद करा, नाहीतर जनता रस्त्यावर उतरुन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.






