पारंपरिक पद्धतीने मळणीचा आनंद

| महाड | वार्ताहर |

कोकणातील ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय. कधी लहरी हवामान, तर कधी मजुरांची कमतरता, नाहीतर कीड रोग अशा अनेक अडचणींचा सामना करत शेतकरी भात लागवड करीत असतो. खरं तर भातशेतीतील प्रत्येक क्षण हा आनंद उत्सव म्हणूनच साजरा होत असतो. आज जग व्यावहारिक बनले आहे, तरीही ग्रामीण भागात पेरणी, लावणी, कापणीबरोबरच मळणीचा आनंद अजूनही टिकून आहे.

शेतामध्ये भाताच्या लोंब्या पिवळ्या धम्मक झाल्या की भाताचे भारे बांधून ते एकत्रित रचून ठेवले जातात. त्याला उडवी म्हणतात आणि मग सोयीची वेळ बघून शेतकरी, त्याचे कुटुंब व आजूबाजूचे सहकारी एकत्रित येत मळणी म्हणजेच भात झोडणीचे काम सुरू करतात. याच मळणीतून मिळणारे भात म्हणजे शेतकऱ्याची कमाई आणि कष्टाचे चीज असते.

एकदा का मळणी झाली की शेतकऱ्याची वर्षभराची अन्नाची बेगमी होते. काही वर्षांपूर्वी मळणी म्हणजे एक मोठा सोहळा असायचा संपूर्ण गावच मळणीसाठी एकत्र यायचे. मळणीमध्ये मोठ्या प्रमाणात श्रम खर्च व्हायचे त्यामुळे मांसाहारी जेवणाची बेत आखले जायचे. अगदी लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वजण या मळणीचा शेतावरती मनसोक्त आनंद घेत. आता काळ बदलला आहे, पूर्वीप्रमाणे गाव एकत्र जरी येत नसला तरी उपलब्ध साधनसामग्री व सहकाऱ्यांच्या मदतीने आजही पारंपरिक पद्धतीने आनंद साजरा होतो.

Exit mobile version