हिंदुस्थानच्या जुनियर वाघांनी रचला क्रिकेटमध्ये इतिहास

युगांडाला 326 धावांनी केले पराभूत
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना महामारीचा हल्लाही ज्यांच्या बुलंद आत्मविश्‍वासाला धक्का पोचवू शकला नाही, अशा हिंदुस्थानी अंडर 19 युवा क्रिकेट संघाने क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास लिहिला. युवा टीम इंडियाने नवख्या युगांडाला 326 धावांनी पराभूत करीत वन डे क्रिकेटमधील विक्रमी विजय साकारला. या विजयाने हिंदुस्थानी युवा संघाने पाचव्या विश्‍वचषक जेतेपद पटकावण्याची आपली महत्वाकांक्षा पुन्हा उघड केली आहे.
हिंदुस्थानच्या आजच्या सुपर विजयाचे शिल्पकार ठरले 120 चेंडूंत 144 धावा फाटकावणारा अंगकृष रघुवंशी आणि 108 चेंडूत नाबाद 162 धावांची धमाकेदार खेळी करणारा राज बावा. हिंदुस्थानी युवा संघ याआधीच उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. राज बावाने तर आज अंडर 19 विश्‍वचषकातील सर्वाधिक नाबाद खेळीचा विश्‍वविक्रम आपल्या नावावर केला.
नवख्या युगांडाविरुद्धच्या लढतीत आज हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करत 405 धावांचा हिमालय उभा केला. जिगरबाज हिंदुस्थानी युवा संघाच्या समोर फारसा अनुभव नसलेल्या युगांडा संघाची पार दाणादाण उडाली. युवा टीम इंडियाने 50 षटकांत उभ्या केलेल्या 405 धावांच्या एव्हरेस्टएवढ्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा डाव फक्त 20 षटकात 79 धावांवर संपुष्टात आला. हिंदुस्थानच्या युवा गोलंदाजांनी त्यांची पार वाताहात उडवली.
या सामन्यात हिंदुस्थानकडून अंगकृष रघुवंशी आणि राज बावाने धमाकेदार शतकी खेळी केल्या. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 206 धावांची भागिदारी केली. रघुवंशीने 120 चेंडूत 22 चौकार आणि 4 षटकारासह 144 धावा केल्या, तर बावाने 108 चेंडूत नाबाद 162 धावांची खेळी केली. त्याने 14 चौकार आणि 8 षटकार मारले. युगांडाकडून पास्कल मुरुंगीने 72 धावा देत 3 विकेट घेतल्या. बावा -रघुवंशीच्या तुफानात युगांडाच्या गोलंदाजीचा पार पालापाचोळा झाला. नवख्या युगांडाकडे हे तुफान थांबवण्यासाठीचे अस्त्रच नव्हते. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहण्यापलीकडे युगांडाचे गोलंदाज आणखी काहीही करू शकले नाहीत.
हिंदुस्थानी संघाने दिलेल्या 406 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाचा संघ 19.4 षटकात 79 धावांवर ऑलआउट झाला. हिंदुस्थानकडून निशांत सिंधूने 4.4 षटकात 19 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर राजवर्धन हंगरगेकर 3 ओव्हरमध्ये 8 धावा देत 2 विकेट घेतल्या.


बावाचा खेळीचा विश्‍वविक्रम
युगांडाविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानच्या राज बावाने दोन नवे विक्रम आपल्या नावावर केले. 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम राजच्या नावावर झाला. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडला. शिखरने 2014च्या वर्ल्डकपमध्ये 155 धावा केल्या होत्या . या शिवाय बावाने 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठी नाबाद धावसंख्या करण्याचा विश्‍वविक्रम देखील केला. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा जॅक रुडोल्फ आणि ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून व्हाइट यांच्या नावावर होता. जॅकने 2000 साली नेपाळविरुद्ध नाबाद 156 तर कॅमेरुनने 2002 साली स्कॉटलंडविरुद्ध नाबाद 156 धावा केल्या होत्या.

Exit mobile version