कर्जत-माथेरान मिनीबस ‌‘रामभरोसे’

मोडकळीस आलेल्या गाडीतून जीवघेणा प्रवास

| नेरळ | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या कर्जत आगाराकडून चालवण्यात येणाऱ्या कर्जत-नेरळ-माथेरान मार्गावरील मिनीबसचा प्रवास सध्या धोकादायक ठरत असून, प्रवाशांचा जीव अक्षरशः ‌‘रामभरोसे’ असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनाट आणि जीर्ण अवस्थेतील या बसमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या मार्गावर सध्या सुमारे 12 वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या मिनीबस धावत आहेत. 2013 साली शासनाने दोन नवीन मिनीबस उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, त्यापैकी एक बस पनवेल मार्गावर वळवण्यात आली असून, माथेरान मार्गावर केवळ एकच मिनीबस सुरू आहे. एमएच 06 एस 9634 क्रमांकाची ही बस वारंवार बंद पडत असल्याने घाटात प्रवाशांना अनेकदा पायी प्रवास करावा लागतो. या मिनीबसमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात असल्याने धोका आणखी वाढत आहे. विशेष म्हणजे, या बसचे स्टेअरिंग मोडकळीस आले असून, अर्धवट तुटलेल्या अवस्थेतच बस चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टेअरिंगवरील रबर निघालेले असून, काचेला प्लास्टिक बाटलीचा आधार देऊन तात्पुरती ‌‘जुगाड’ व्यवस्था करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.

माथेरान घाट रस्ता हा देशातील अत्यंत अवघड घाटरस्त्यांपैकी एक मानला जातो. सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या या घाटात वाहन चालवताना विशेष कौशल्य आवश्यक असते. अशा परिस्थितीत जीर्ण आणि धोकादायक मिनीबस चालवली जात असल्याने प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते गिरीश पवार यांनी स्वतः या बसने प्रवास करून परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी बसचे स्टेअरिंग तुटलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. “ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो,” असा इशारा त्यांनी दिला.

पवार यांनी शासनाकडे तातडीने नवीन मिनीबस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक आमदारांनीही या प्रश्नात लक्ष घालून माथेरानकरांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णपणे धोकादायक स्थितीत सुरू असून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Exit mobile version