लिपनिवावे पूल गेला पाण्याखाली
अनेक गावांचा संपर्क तुटला
| आंबेत | वार्ताहर |
सतत कोसळणार्या पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. म्हसळा तालुक्यातील लिपनिवावे पूल पाण्याखाली गेल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा परिसरातील गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लिपनिवावे पुलाचेदेखील अर्धवट काम राहिल्याने पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाचा भाग हा पाण्याखाली गेल्याने या परिसरातील जवळजवळ 10 ते 15 वाड्यांचा संपर्क तुटला आहे त्यामुले येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दळणवळणाची व्यवस्थादेखील ठप्प पडल्याने परिसरात नागरिकांची मोठी तारांबळ उडताना दिसत आहे. मागील पावसाळ्यातदेखील हा पूल पाण्याखाली गेल्याने पाऊस ओसरेपर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे मागील प्रकार लक्षात घेत पुलाचे योग्य नियोजन करणे गरजेचे होते; परंतु अशा अपुर्या कामकाजमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी विनंती आता नागरिकांकडून होताना दिसत आहे.