50 फुटांपर्यंतचे वृक्ष तोडल्यानंतर आता 5 इंचाचे वृक्षारोपण सुरू
| पोलादपूर | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतची सुमारे 50 ते 100 वर्षांपूर्वीचे तब्बल 50 फूट उंचीचे महाकाय वृक्ष तोडून गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महामार्ग बोडका केला गेला असताना, सध्या गेल्या महिन्यापासून लोहारे पूल ते टोलनाक्यापर्यंत अचानक रस्ता दुभाजकावर वृक्षवल्लीच्या सोयरिकीचा नमुना म्हणून केवळ 5 ते 10 इंचाची रोपे लावण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या टप्प्याचे पळस्पे पनवेल ते माणगांव इंदापूरपर्यंतचे काम गेली दहा वर्षे सुरू असून, ते पूर्णत्वास गेले नसले तरी या पहिल्या टप्प्यातील सुमारे 10 हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या कामातील कर्नाळा पक्षीअभयारण्य आणि सुकेळी खिंड भागात वृक्षतोडीचे प्रमाण सर्वाधिक होते. इंदापूर ते चिपळूणदरम्यानच्या दुसर्या टप्प्यातील महाड तालुक्यातील वीर ते पोलादपूर तालुक्यातील भोगावपर्यंतच्या मधल्या टप्प्याचे चौपदरीकरण करण्यासाठी लार्सन अॅण्ड टूब्रो कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या मधल्या टप्प्यामध्ये 2 हजार 817 एवढ्या पूर्ण विकसित झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यापैकी वनविभागाच्या महाड गटामध्ये 1 हजार 49 तर पोलादपूर गटामध्ये 697 पूर्ण विकसित झाडांची कत्तल करण्यात आली आहे. ही संख्या केवळ सामाजिक वनीकरण विभागामार्फत लागवड करून वनविभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या झाडांची असून, खासगी मालकी झाडांचा मोबदला मूळ मालकांना देण्यात येऊन या झाडांची कत्तल करण्यास वनविभागाची अनुकूलता प्राप्त होऊन वनसंवर्धन व वनरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभागाला मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 बाबत पूर्णत: विपरित असे वृक्षतोडीची परवानगी देण्याचे धोरण राबवावे लागले. मात्र, यानंतर लार्सन अॅण्ड टूब्रो कंपनीला यासाठी 10 हजार झाडांची लागवड करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. सद्यःस्थितीत, तोडलेल्या एका वृक्षाच्या खोडाचा व्यास सुमारे अर्धा ते दीड मीटर एवढा रूंदीचा अन् पानांचे प्रमाणही डेरेदार असताना, नव्याने लावले जाणार्या नवे रोपट्यांची उंची 5 ते 10 इंच असून, केवळ अर्धा ते एक सेंटीमीटर व्यासाचे खोड आणि पानेही केवळ 15-20 असणार या वस्तुस्थितीमुळे वृक्षतोडीच्या चारपटीने वृक्षलागवड करूनही सावली मिळणार नसून, कार्बनक्रेडीटचा प्रश्नदेखील सुटत नसल्याचे दिसून येत आहे.
यादरम्यान, पोलादपूर तालुक्यात अचानक राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध रस्तादुभाजकावर वृक्षवल्लीसोबत सोयरिक कोणी सुरू केली आहे, याबाबत चर्चा सुरू असून एलऍण्डटी ठेकेदार कंपनीने हे काम परस्पर पोटठेकेदारामार्फत सुरू केले असून या कामाच्या दर्जा व गुणवत्ता नियंत्रणासाठी वनविभागामार्फत तसेच सामाजिक वनीकरण विभागामार्फत विशेष प्रयत्न होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.