कुर्डुस ते सुतकवाडी रस्त्याची चाळण!

वर्षभरापासून डांबरीकरण रखडले; नागरिकांसह वाहनचालकांचे हाल, आंदोलनाचा इशारा

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते सुतकवाडी दरम्यानच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून केला जात आहे. वर्षभरापूर्वी रस्ता खोदून त्यावर बीबीएम टाकण्यात आले; मात्र त्यानंतर डांबरीकरणच झाले नसल्याने पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेवक, स्थानिक आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांकडूनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कुर्डुस ते सुतकवाडी, कुर्डुस ते आनंदवाडी आणि कुर्डुस ते डांगी या मार्गांचीही दुरवस्था झाली आहे. विशेषतः शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे दाखवून प्रत्यक्षात कामे न करताच बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्ते झाले नसतील तर कामे पूर्ण झाल्याची बिले काढली कोणी? याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका कुर्डुसकरांना सहन करावा लागत असून, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून डांबरीकरण करण्यात आले नाही, तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version