| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वात मोठे अग्निशमन दलाचे केंद्र कामोठे उपनगरातील मानसरोवर रेल्वे स्थानकासमोरील चौकातील सूमारे 7 हजार चौरस मीटर जागेवर उभारले जाणार आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पुर्ण केल्या असून, 28 कोटी रूपये खर्च करून बांधल्या जाणाऱ्या अग्निशमन दल केंद्राची इमारत हायटेक पद्धतीची उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच पार पाडली जाईल.
कामोठे उपनगराची वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन येथे अग्निशमन दलाचे केंद्र उभारावे अशी मागणी येथील रहिवाशी तसेच सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांकडून वारंवार केली जात होती. या मागणीचा विचार करून सिडको मंडळाकडून मोक्याचा भूखंड मिळण्यासाठी पनवेल महापालिकेचा पाठपुरावा सुरू होता. सिडकोकडून संबंधित भूखंड ताब्यात घेतल्यावर या भूखंडावर बांधण्यात येणाऱ्या केंद्राच्या आराखड्यानूसार खर्चाला पनवेल महापालिका प्रशासनाने नूकतीच मंजूरी दिली. याबाबतची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर बांधकामाला सुरूवात होईल.
कामोठे येथील हे अग्निशमन दलाचे केंद्र सुरू झाल्यावर येथे दोन अग्निशमन बंबासह 40 अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या दलाच्या केंद्रामध्ये भविष्यात नवी मुंबई, सिडको मंडळ आणि पनवेल महापालिकेचे संयुक्त नियंत्रण कक्ष केंद्र (इंट्रीग्रेटेड कंट्रोल रूम सेंटर) यामध्ये उभारला जाईल. या केंद्रात आपत्ती व्यवस्थापनासह तीनही यंत्रणेचे अग्निशमन अधिकारी एकत्र बसू शकतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हॉटलाईनला सुद्धा याच केंद्रातून समन्वय साधला जाईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 8 किलोमीटरच्या अंतरावरील सर्वच अग्निशमनच्या यंत्रणेसोबत विमानतळ व्यवस्थापन करारबद्ध असल्यामुळे आगीच्या आपत्तीवेळी संयुक्त यंत्रणा एकामेकांना सहकार्य करणार असा हा करार असल्यामुळे या करारामुळे पनवेलच्या अग्निपंखात बळ येणार आहे. कामोठे हायटेक अग्निशमन दलाच्या बांधण्याचा पहिल्या टप्यात फायर स्टेशन आणि कार्यालयासाठी चार मजली इमारत असणार आहे. सध्या पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सेवेत 16 अग्निशमन बंब आणि 158 कर्मचारी व अधिकारी आहेत. कामोठे येथील नवीन अग्निशमन दल सुरू झाल्यानंतर अजून 40 ते 50 कर्मचारी वाढण्याची शक्यता आहे. अजूनही तीन बंब नव्याने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पनवेल महापालिकेकडे सातव्या मजल्यापर्यंत उंचीवर अग्निशमन दलाचे जवान आणि बंबासह पाण्याचा मारा करता येऊ शकते अशी व्यवस्था आहे. सिडको मंडळ आणि नवी मुंबई महापालिकेकडे 22 मजल्यापर्यंत उंच अग्निबंबाचे पाणी पोहचू शकेल अशी यंत्रणा आहे.






