विश्‍वविजेतेपदाचा मान मिळवण्याची अखेरची संधी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारताच्या दोन महान खेळाडूंना विश्‍वविजेतेपदाचा मान मिळवण्याची अखेरची संधी असणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा हे दोनही दिग्गज वेस्ट इंडीज व अमेरिका येथे आपला अखेरचा टी-20 विश्‍वकरंडक खेळण्याची दाट शक्यता आहे. 2013 नंतर भारतीय संघ आयसीसी आयोजित स्पर्धांच्या जेतेपदापासून सातत्याने दूर राहिला आहे. विराट व रोहित यांना हा विजेतेपदाचा दुष्काळही संपवायचा असेल. त्यामुळे येत्या 2 जूनपासून सुरू होणारी टी-20 विश्‍वकरंडक ही प्रतिष्ठेची स्पर्धा या दोघांसह भारतासाठीही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 मध्ये टी-20 विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर अद्याप भारतीय संघाला टी-20 विश्‍वकरंडकाच्या अजिंक्यपदाला गवसणी घालता आलेली नाही. या विश्‍वविजेत्या संघात रोहित शर्माचा समावेश होता. मात्र विराट कोहली नव्हता. त्यानंतर भारतीय संघाने 2011मध्ये महेंद्रसिंग धोनीच्याच नेतृत्वात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. 1983नंतर भारत विश्‍वविजेता बनला. या विश्‍वविजेत्या संघात विराट कोहली होता. या संघात रोहितचा समावेश नव्हता.

चॅम्पियन्स ट्रॉफीत दोघेही खेळलेमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 मध्ये इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स करंडकात विजेता होण्याचा मान संपादन केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडवर मात करीत भारताने विजेतेपदाचा करंडक उंचावला होता. या स्पर्धेत विराट व रोहित या दोनही खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताने या स्पर्धेनंतर आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारा एकही करंडक जिंकलेला नाही. रोहित शर्माचे सध्याचे वय 37 आहे. तसेच विराट कोहली 35 वर्षांचा आहे. पुढचा टी-20 विश्‍वकरंडक 2026मध्ये भारत व श्रीलंका येथे होणार आहे. त्यानंतर 2027मध्ये दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तोपर्यंत या दोनही खेळाडूंचे वय वाढणार आहे. त्यामुळे दोघांसमोरही वयाची मर्यादा असणार आहे.

Exit mobile version