ग्रामस्थांसह आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पडसरे गावाजवळील पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पडसरे गावासह, लोळगेवाडी, एकलघर व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला जोडणारा हा एकमेव पूल आहे. पुलावरून ग्रामस्थांसह आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी येथून येजा करतात. हा धोकादायक पूल अचानक ढासळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी श्री दत्तगुरु ग्रामस्थ मंडळ पडसरे यांच्यातर्फे महागाव सरपंचांना पूल दुरुस्ती संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पडसरे आश्रमशाळेत सुधागड तालुक्यासह अलिबाग, पेण, खालापूर, रोहा या पाच तालुक्यातील एकूण पाचशे हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे इथे विद्यार्थी व त्यांच्या पालकांची सतत ये जा सुरू असते. विद्यार्थी गावी जाणे किंवा दवाखान्यात जाणे आदी कारणासाठी सतत वाहतुकीची वर्दळ असते. शिवाय गावकरी व आश्रमशाळेतील कर्मचारी वर्ग दैनंदिन गरजे साठी लागणार्या साहित्याची ने-आण सुद्धा या पुलावरून करतात. या पुलाखालून मोठा धबधबा वाहतो. पुलाची सध्याची दुरवस्था आणि पावसाळ्यात प्रचंड रौद्ररूप धारण करणारा धबधब्याच्या प्रवाहात हा पुल किती तग धरेल याची चिंता ग्रामस्थ, आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-पालक व अभ्यंगस्तांना भेडसावत आहे. हे सर्वच जण जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करत आहेत.
पुलाची दुर्दशा
या पुलाच्या प्लास्टरमधून लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. त्या अक्षरशः खाली लोंबकळत आहेत. तर काही खाली कोसळल्या देखील आहेत. पुलाचे संरक्षण कठडे तुटले आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टर निघाले आहे. सर्वत्र गवताचे आच्छादन आहे. अशा प्रकारे अत्यंत वाईट अवस्था या पुलाची झाली आहे.
ग्रामस्थांचे पुल दुरुस्तीचे पत्र येण्याआधीच पूल दुरुस्ती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार केला आहे. तसेच लागलीच संबधीत अधिकार्यांची भेट देखील घेणार आहे. पूल दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. -भास्कर पार्टे, सरपंच, महागाव ग्रामपंचायत






