| रायगड | प्रतिनिधी |
जमीन खरेदी करीत आहात. जागा मालकाने अथवा एजंटने ती दाखविली आहे. दस्तनोंदणीच्या वेळी दाखविलेली जागा त्याच ठिकाणी आहे. जशी दाखविली, तशाच आकाराची ती आहे का, अशा अनेक शंका उपस्थित होतात, परंतु आता घाबरण्याची गरज नाही. दस्तनोंदणीच्या वेळीच त्या जागेचा रेडी-रेकनरमधील दराबरोबरच त्या जागेचा अक्षांश-रेखांक्षदेखील पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे दाखविलेली जमीन, खरेदी करीत असलेली जमीन यांची खात्री होण्यास मदत होणार आहे.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) यांच्याबरोबर करार केला आहे. ‘एमआरसॅक’ यांच्याकडे राज्यातील गावनिहाय उपलब्ध असलेल्या गट नंबरनिहाय जीआयएस नकाशे रेडी-रेकनरची लिंक करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शहर व गावातील सरकारी, खासगी जागांचे रेडी-रेकनरमधील दर ‘जिओ पोर्टल’वर एका क्लिकवर पाहावयास मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर ती जागा नेमकी कुठे आहे, तिचे कोर्डींनेट्स (अक्षांश-रेखांक्ष) मिळणार आहे. दाखविलेली जागा एक आणि दस्तनोंदणी केल्यानंतर ती जागा निघाली दुसरीकडेच, अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
शहर, गाव, तालुका निहाय जमिनींचे रेडी-रेकनरमधील दर मिळावेत, यासाठी हे पोर्टल विकसित केले आहे. त्यासाठी तीन टप्पे केले आहेत. शहर, शहरालगतचे प्रभाव क्षेत्र आणि ग्रामीण भाग, असे हे तीन टप्पे आहेत. ‘एमआरसॅक’ची मदत घेऊन त्यांच्याकडील नकाशे आणि रेडी-रेकनरमधील दर यांचे एकत्रीकरण येत आहे. आतापर्यंत राज्यातील शहर महापालिका असलेल्या 22 जिल्ह्यांचे रेडी-रेकनर अपलोड करण्याचे काम झाले आहे. उर्वरित 13 जिल्ह्यांची माहिती अपडेट करण्याचे काम बाकी आहे. येत्या वर्षात हे काम पूर्ण होईल, असे नोंदणी मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘एमआरसॅक’कडे उपलब्ध असलेले गाव आणि गट नंबरनिहाय नकाशे उपलब्ध करून त्यावर रेडी-रेकनरचे दर अपलोड करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गटनंबर अथवा सर्व्हे नंबरनिहाय एका क्लिकवर जमिनींचे दर कळणार आहेत. एवढेच नव्हे, तर त्या जागेचे अक्षांश-रेखांक्षदेखील मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या जागांसह सर्व जागांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे.
अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक







