रानसई धरणाची पातळी खालवली

भीषण पाणीटंचाईच संकटाची भिती, पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला गळती
| उरण । वार्ताहर ।
उरण शहर, तालुक्यातील प्रकल्प आणि 25 गावांना पाणी पुरवठा करणार्‍या रानसई धरणातील पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे शहरातील व गावातील रहिवाशांना पिण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईच संकट ओढावत असताना एम आय डी सीच्या अधिकारी वर्गाला ठिक ठिकाणी लागलेल्या जलवाहिनीच्या गळतीकडे लक्ष केंद्रित करण्यास वेळच मिळत नाही. त्यामुळे गळती लागलेल्या जलवाहिनीतून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

तालुक्याच औद्योगिकीकरण व नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. अशा वाढत्या औद्योगिकी करणातील प्रकल्पांना तसेच शहर, तालुक्यातील 25 गावातील रहिवाशांना रानसई धरणातून एम आय डी सीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु वाढत्या नागरीकरणाला अल्प प्रमाणात पाणी पुरवठा हा रानसई धरणातून होत असल्याने सिडकोच्या हेटवणे धरणातील पाण्यावर रहिवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. एकंदरी भविष्यात उरणकरांवर भीषण पाणीटंचाईच संकट ओढावणार असतांनाही लोकप्रतिनिधी शासन या समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत.

त्यात सध्या रानसई धरणातून रहिवाशांना करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला ठिक ठिकाणी गळती लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.एकंदरीत अशा गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.तरी एम आय डी सीच्या अधिकारी वर्गाने उरणकरांवर ओढावणार्‍या पाणी टंचाईवर ठोस उपाययोजना करावी तसेच गळती लागलेल्या जलवाहिनीची गळती थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरणची जनता करत आहेत.

Exit mobile version