जिल्ह्यात जीवनवाहिनी हळूहळू मार्गावर

आता पर्यत 1099 कर्मचारी कामावर हजर, पाच महिने प्रवाशांचे हाल
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी एसटी विभागात सुमारे 152 दिवस कामगारांचा संप सुरू आहे. परंतु आता कर्मचार्‍यांच्या बाजूने चांगल्या घोषणा करण्यात आल्यामुळे आज 30 कर्मचारी नव्याने कामावर हजर झाले. आता पर्यत जिल्ह्यात 1099 कर्मचारी हजर झाले आहेत. पुढील दोन दिवसांत बरेच कर्मचारी हजर होतील, अशी माहिती एसटी अधिकार्‍यांनी दिली.
राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या महत्त्वाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप सुरू केला. परंतु ही मागणी राज्य शासनाने धुडकावून लावली आहे. हे शक्य नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतू, सातवा वेतन आयोग लागू होणार, अशी बातमी कर्मचार्‍यांना प्राप्त झाल्याने माळनाका येथे संपावर असलेले कर्मचारी ढोल-ताशे वाजवत होते. त्यातच 8 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचार्‍यांनी केलेला हल्ला आणि कर्मचार्‍यांचे वकील सदावर्ते यांना झालेली अटक, यामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये चलबिचल सुरू झाली.
दरम्यान, रत्नागिरी एसटी विभागात आज चालक 10, वाहक 4, चालक तथा वाहक 12, कार्यशाळा कर्मचारी 2, प्रशासकीय 2 असे 30 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या संपात एसटी कर्मचारी 100 टक्के हजर होते. परंतू, न्यायालयाकडून येणारा निकाल, सातत्याने पुढे जाणार्‍या तारखा, महामंडळ प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या कारवाईच्या नोटीसा, यामुळे हा संप न भूतो न भविष्यती झाला. काही कर्मचार्‍यांनी आत्महत्यासुद्धा केल्या. यामुळे एसटी कर्मचारी हवालदिल झाले होते. गेले पाच महिने सामान्य प्रवाशांसह नोकरदारांची दाणादाण उडाली. आता कर्मचारी हजर होऊ लागल्याने वाहतूक पूर्णांशाने चालू होईल, अशी अपेक्षा एसटी कर्मचार्‍यांना आहे.

Exit mobile version