| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा वसाहत सेक्टर 6 येथील गार्डनमध्ये करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून संध्याकाळी व रात्री आकर्षक ‘लाईट फुलपाखरू’ बसवण्यात आले होते. सुरुवातीला या लाईटमुळे गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांना वेगळा आणि आनंददायी अनुभव मिळत होता. मात्र, अवघ्या दोन महिन्यांतच ही लाईट्स बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पालिकेकडून गार्डनसाठी सुरक्षा रक्षक व सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. नियमित देखभाल आणि तपासणीचा अभाव असल्यामुळेच ही अवस्था निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांच्या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी या लाईट्सची दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, अल्पावधीतच पुन्हा त्या बंद पडल्याने सुशोभीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘गार्डनसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता तपासली जाते का?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. करदात्यांच्या पैशातून करण्यात आलेल्या कामांची योग्य निगा राखली जात नसल्याने सार्वजनिक निधी वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी व गार्डनमधील सुविधा कायमस्वरूपी कार्यरत ठेवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
खांदा कॉलनी येथील गार्डनमधील ‘लाईट फुलपाखरू’ बंद
