| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा कॉलनी प्रभाग क्रमांक 15 मध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्ष छाटणीचे काम दिनांक 20 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम राबविण्यात येत असून, रस्त्यालगतची धोकादायक झाडे व फांद्या काढण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेली मोठी झाडे अचानक कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान होते, तसेच अनेकदा नागरिक जखमी होण्याच्या घटनाही समोर येतात. याशिवाय, वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे रस्त्यावरील वीज खांबांवरील लाईट झाकले जातात, परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अंधार पसरतो व नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर 23 एप्रिल रोजी अहिल्यादेवी होळकर उद्यान तसेच अष्टविनायक हॉस्पिटल परिसरातील झाडांची छाटणी करण्यात आली. या कामामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून, रस्त्यांवरील प्रकाशव्यवस्था सुधारण्यासही हातभार लागणार आहे. खांदा कॉलनीतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांच्या परिसरातील फूटपाथवरील झाडे किंवा धोकादायक फांद्यांची माहिती छायाचित्रासह द्यावी. यासाठी 9833101533 या क्रमांकावर सचिदानंद कौटकर यांच्याशी संपर्क साधावा. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक दशरथ बाळू म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.







