खऱ्या आंब्याचा शोध घेणे मात्र कठीण
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरात सध्या विविध प्रकारच्या आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, देवगड हापूस या नावाखाली इतर आंब्यांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. मद्रास आंबा तसेच इतर स्थानिक जातीचे आंबेही हापूस म्हणून विकले जात असल्याची ग्राहकांकडून तक्रार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर ग्रामीण भागातील विक्रेते मोठ्या प्रमाणावर बसले असून, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील आंबे विक्रीसाठी आणले जात आहेत. ग्राहकांना हापूसच हवा असतो, त्यामुळे तसे सांगावे लागते, असे काही विक्रेत्यांनी स्पष्ट केले. यावर्षी कोकणातील आंबा उत्पादन कमी असल्याने खऱ्या देवगड हापूसचा तुटवडा जाणवत आहे. उच्च प्रतीचा आंबा निर्यातीसाठी परदेशात पाठवला जात असल्याने स्थानिक बाजारात दर्जेदार हापूस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने जेवणात आंबा रसाची मागणी वाढली असून, केटरर्सकडे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स दिल्या जात आहेत.
हापूस कसा ओळखावा?
आंब्याला नैसर्गिक गोड सुगंध असतो.
साल हलकी पिवळी-केशरी, डाग कमी असतात.
हाताला थोडा मऊ आणि वजनाने हलका वाटतो.
देठाजवळ सुगंध अधिक जाणवतो.
अतिशय चमकदार किंवा एकसारखा रंग असल्यास शंका घ्यावी.
तज्ज्ञांचा सल्ला
उष्ण हवामानात आंब्याचे अति सेवन टाळावे. आंबा खाण्यापूर्वी 20-30 मिनिटे पाण्यात भिजवून खाल्ल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते. एकंदरीत, हापूस या नावावर बाजार तेजीत असला तरी खऱ्या देवगड हापूसचा शोध घेणे ग्राहकांसाठी अजूनही आव्हान ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना आंब्याची गुणवत्ता आणि सुगंध तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दर (सध्याचा बाजारभाव) : अंदाजे
देवगड हापूस : 800 ते 1500 प्रति डझन
रत्नागिरी आंबा : 600 ते 1200 प्रति डझन
इतर स्थानिक आंबे : 300 ते 700 प्रति डझन







