मराठी, हिंदीसह नऊ भाषांमध्ये आवाज घुमणार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी 4 तारखेला उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यावेळी सर्व दहा संघाचे कर्णधार एकत्र येण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. विश्वचषकाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेसाठी अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने खास तयारी केली आहे. विश्वचषकात समालोचन करणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी, हिंदीसह नऊ भाषांमध्ये समालोचन होणार आहे. त्यासाठी तब्बल 120 समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश आहे.
विश्वचषक सामन्यावेळी अनेक दिग्गज समालोचन करताना पाहायला मिळतील. सुनील गावसकर, रिकी पाँटिग, इयॉन मॉर्गन, शेन वॉटसन आणि वकार युनूससारख्या दिग्गजांचा या यादीत समावेश आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह नऊ भाषांमध्ये क्रिकेट चाहते समालोचन ऐकू शकतील. प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळे दिग्गज आहेत. मराठी, तामिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली, गुजराती आणि मल्याळम यासारख्या भाषांमध्ये समालोचन होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन विश्वचषकात प्रेजेंटरच्या भूमिकेत दिसेल. ग्रेसशिवाय विश्वचषकात आठ प्रेजेंटर असतील. त्यासोबत इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॉफ डु प्लेसी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून समालोचनासाठी सहभागी असतील. लिसा स्थळेकर, रमीज राजा, रवी शास्त्री, ऍरॉन फिंच, सुनील गावसकर आणि मॅथ्यू हेडन यांचा समावेश असेल. तसेच, इयान स्मिथ, नासिर हुसेन आणि इयान बिशप हे आयसीसी समालोचन बॉक्समध्ये दिसेल.
शॉन पोलॉक, अंजुम चोप्रा आणि मायकल एथर्टन समालोचन बॉक्समध्ये दिसतील. सायमन डूल, म्पुमेलेलो मबांगवा, संजय मांजरेकर, केटी मार्टिन, दिनेश कार्तिक, डर्क नॅनेस, सॅम्युअल बद्री, अतहर अली खान आणि रसेल अर्नाल्डही कॉमेंट्री पॅनेलमध्ये असतील. समालोचक हर्षा भोगले, कास नायडू, नार्क निकोलस, नताली जर्मनोस, मार्क हॉवर्ड आणि इयान वॉर्ड यांसारखे दिग्गजही समालोचन करताना दिसतील.
चेन्नईत भारताचा पहिला सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आहेत. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरोधात दोन हात करेल. हा सामना दिल्लीमध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांची लढत होणार आहे.