मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवेचे काम अपूर्ण
| रायगड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-66) क्र. 66 च्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासीयांसह वाहनचालक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 31 मे पर्यंत महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होईल, असे संकेत दिले होते; मात्र, प्रत्यक्ष मे महिना संपत आला तरी अनेक ठिकाणी काम अत्यंत संथगतीने सुरू असून, हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक टप्प्यांमध्ये रस्त्यांचे काम अजूनही रखडलेले आहे. महामार्गावर मुख्य गावांमध्ये सेवारस्ते (सर्व्हिस रोड) तयार नसल्याने वाहनांना अरुंद आणि खड्डेमय मार्गांवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विविध ठिकाणी उड्डाणपूल, नाले, रस्त्यांच्या साईडपट्ट्या आणि डांबरीकरणाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत महामार्गावरील धुळीमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक पुरते त्रस्त झाले होते. आता मॉन्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पाऊस सुरू झाल्यानंतर या अपूर्ण रस्त्यांवर चिखल होणे, पाणी साचणे आणि परिणामी मोठी वाहतूक कोंडी होण्याचा धोका आहे. विशेषतः घाटपरिसर आणि जिथे कामे सुरू आहेत अशा भागांमध्ये पावसाळ्यात वाहने घसरून अपघातांचा धोका प्रचंड वाढणार आहे.
पर्यटन आणि व्यापाराला फटका
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवासी संघटनांकडून महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. महामार्ग रखडल्यामुळे कोकणातील पर्यटन, वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक व्यापारावर अत्यंत विपरीत परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
ठेकेदारांचे दावे कागदावरच!
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांकडून काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी किमान धोकादायक ठिकाणांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
